![]() |
फोटो : अविनाश साबळे प्रियंका गोस्वामी |
नवी दिल्ली : बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी सुरू आहे. काल (६ ऑगस्ट) स्पर्धेच्या नवव्या दिवशी अॅरथलेटिक्समध्ये भारताला दोन ऐतिहासिक पदकं मिळाली. महिलांच्या दहा हजार मीटर चालण्याच्या शर्यतीत प्रियांका गोस्वामीने रौप्य पदक जिंकले. यानंतर मराठमोळ्या अविनाश साबळेने तीन हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीमध्ये रौप्यपदक पटकावले.
अविनाश साबळेने पुरुषांच्या तीन हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकले. त्याने ८.११.२० मिनिटांत आपली शर्यत पूर्ण केली. यासह त्याने तीन हजार मीटर शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम केला. अविनाश हा सुवर्णपदक विजेत्या अब्राहम किबिव्होटपेक्षा फक्त ०.५ सेकंद मागे होता. केनियाच्या अब्राहमने ८.११.१५ मिनिटांत आपली शर्यत पूर्ण केली. प्रियांकाने महिलांच्या १० हजार मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकले. तिने ४३.३८ मिनिटांत आपली शर्यत पूर्ण केली. ऑस्ट्रेलियाच्या जेमिमाने ४२.३४ मिनिटांची वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले. या शर्यतीत पहिली चार मिनिटे प्रियांका आघाडीवर होती. मात्र, नंतर ऑस्ट्रेलियाच्या जेमिमाने आघाडी घेत सुवर्णपदक जिंकले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करून प्रियंकाचे कौतुक केले आहे. २०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत २९ पदके जिंकली आहेत, ज्यात नऊ सुवर्ण, ११ रौप्य आणि नऊ कांस्य पदकांचा समावेश आहे.