कारवरील सुटले नियंत्रण अन युवतीचा जन्मदिवस ठरला मृत्यूदिवस!नाशिक : वाढदिवस साजरा करण्यासाठी सात मित्र-मैत्रिण काश्यपी धरणाकडे बुधवारी (दि.३) गेले होते. तेथे सर्वांनी मिळून कोमल ओमप्रकाश सिंग (१८,रा.पाइपलाइन रोड,आनंदवली) हिचा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर  पुन्हा नाशिकच्या दिशेने परतीचा प्रवास इरटिगा कारमधून सुरु केला. महादेवपूर शिवारात कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्यालगतच्या एका भुखंडाच्या संरक्षक भींतीवर आदळून उलटली. या अपघातात कोमलचा मृत्यू झाला तर तिचे सहा मित्र-मैत्रिण गंभीररित्या जखमी झाले आहेत.याबद्दल अधिक माहिती अशी कि,  पंचवटीतील हिरे महाविद्यालयात शिकणारे महाविद्यालयीत मित्र-मैत्रिणींचा ग्रूप कॉलेजला जात असल्याचे सांगून घरातून बुधवारी बाहेर पडले. दरम्यान, कोमलचा वाढदिवस असल्याने सर्वांनी काश्यपी धरण परिसरात तिचा वाढदिवस साजरा करण्याचा बेत आखला. तन्वीर निसार मन्सुरी (२२,रा.पखालरोड) याने इरटिगा कार (एम.एच१५ ई.एक्स ०९४९) चालवून काश्यपी धरणावर नेली. सर्वांनी तेथे आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा केला. संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास हे सर्व विद्यार्थी पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाले. नाशिककडे गिरणारे-दुगावमार्गे येत असताना गंगापुर धरणाच्यापुढे महादेवपूर शिवारात कारचालक तन्वीर याचा ताबा सुटला. यामुळे भरधाव कार रस्त्यालगतच्या एका संरक्षक भींतीवर जाऊन धडकली. या धडकेत कारचा चुरा झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना रुग्णवाहिकांमधून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रात्री उशीरा उपचारादरम्यान कोमलचा मृत्यू झाला.  याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured