मुंबई -मुंब्रा येथील 22 इमारतींना रेल्वेने नोटीस बजावून त्या रिकाम्या करण्याचे सूचित केले आहे. मात्र, मुंब्राच काय, कल्याण, मुंबईतील एकाही नागरिकांना बेघर होऊ देणार नाही. यापुढे नोटीसच काय, सदर इमारतींच्या जवळपासही फिरकू देणार नाही. ज्या नागरिकांनी हर घर तिरंगा अभियानात सहभाग घेऊन आपल्या घरांवर तिरंगा फडकवला त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये बेघर होऊ देणार नाही, असे वक्तव्य माजी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी मध्य रेल्वेचे मंडल प्रबंधक सलभकुमार गोयल यांची बुधवारी भेट घेऊन दिला.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वे प्रबंधक सलभकुमार गोयल यांना सांगितले की, मुंबईतील सुमारे 30 हजार झोपड्या आणि मुंब्रा ते कल्याण दरम्यानच्या शेकडो इमारती पाडण्याचे धोरण रेल्वेचे असले तरी आता 40 वर्षानंतर कोणालाही बेघर करण्याचा अधिकार केंद्र सरकारला नाही. केंद्र सरकारने माणुसकीची कास धरुन नागरिकांना बेघर करू नये. तसा प्रयत्न झाला तर इमारतींच्या आसपासही रेल्वेच्या प्रशासनाला फिरकू देणार नाही. फारफार तर गोरगरीबांवर गोळीबार कराल; पण, त्यापेक्षा अधिक काही आपण करणार नाहीत; त्यामुळे या नोटीसा रद्द कराव्यात, अशी मागणीही आव्हाड यांनी केली. त्यावर रेल्वे प्रबंधकांनी याबाबत वरिष्ठांना कळविण्यात येणार असून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.