जालना - मराठवाड्यात शेतकऱ्याच्या आत्महत्यांच्या वाढते प्रमाण लक्षत घेता आता बँकांनी शेतकऱ्यांची फाईल येताच तात्काळ कारवाई करावी कुठलाही शेतकरी पीक विमा,पीक कर्ज,आणि नुकसान भरपाई पासुन वंचित राहू नये. असे न झाल्यास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी सक्त ताकीद कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी जालन्यात पार पडलेल्या विभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली आहे.
दरम्यान, अब्दूल सत्तार यांनी कृषी मंत्री पदाचा पदभार स्वीकारताच मराठवाड्यातील विभागीय कृषी अधिकारी यांची तातडीने बैठक बोलवली. या बैठकीसाठी विभागातील सर्व जिल्हाधिकारी, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी,विभागीय कृषी सह संचालक, कृषी आयुक्त, पुणे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच ज्यांना जालना येथे उपस्थित राहता येणार नाही, त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहण्याच्या सुध्दा सूचना देण्यात आल्या आहेत.