ठाणे : 'गोविंदा थर लावून दहीहंडी फोडतात, मात्र आम्ही देखील ५० थर लावून सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला. त्यानंतर ठाण्यातील शिवसेना नेते, खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले.
मुख्यमंत्र्यांवर भाष्य करताना विचारे म्हणाले, 'दहीहंडी हा उत्सव सर्वांचा आहे. तो सर्वांनी साजरा करावा. आपण जी दहीहंडी करतोय, ती आनंद दिघे यांनी सुरू केली दहीहंडी आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या टीकेवर बोलताना विचारे म्हणाले, 'कोण कोणाची दहीहंडी फोडतो हे लवकरच कळेल'.
तसेच, राजन विचारे म्हणाले, 'दहीहंडी मागील दोन वर्ष महामारीमुळे साजरी करता आली नाही. पण यावर्षी जल्लोषात दहीहंडी साजरी होत आहे. तोच उत्साह आहे. आनंद दिघे यांनी सुरू केलेली दहीहंडी आहे ही त्याला विशेष महत्व आहे'.