मुंबई: आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. राज्य सरकारकडून या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने महिलांसाठी एक खास अभियान राबवलं जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात एक घोषणा केली आहे.
आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत "माता सुरक्षित तर घर सुरक्षित" हे विशेष अभियान राबवलं जाणार आहे. 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान चालणाऱ्या या अभियानात घरातील माता निरोगी राहावी, जागरूक राहावी आणि समाजात तिच्या आरोग्याबद्दल संवेदनशीलता निर्माण व्हावी असा आमचा उद्देश आहे. यानिमित्ताने राज्यातील सर्व माता,भगिनींनी आपल्या आरोग्याची आवश्य तपासणी करून घ्यावी अशी विनंती आपल्याला करीत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
या अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर नवरात्र कालावधीत रोज सकाळी 9 ते 2 या वेळेत 18 वर्षावरील महिला, माता यांच्या सर्वांगीण महिलांची तपासणी होईल. आजारी महिलांना उपचार आणि आवश्यकतेनुसार जिल्हास्तरावर उपचारासाठी पाठवण्यात येणार आहे. उपकेंद्र किंवा आरोग्य वर्धिनी केंद्रावर समुदाय आरोग्य अधिकारी यांनी तपासणी करावयाची असून यासाठी अंगणवाडी किंवा ग्रामपंचायतीमध्ये तपासणी शिबीरे घेण्यात येणार आहेत. तसेच, नवविवाहित महिलांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.सोनोग्राफी शिबिरे आणि कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांबाबतही या दरम्यान माहिती देण्यात येणार आहे.