नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दसरा मेळावा घेण्यावर ठाम असल्याने त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना आदेश दिला. 5 ऑक्टोबरला दसरा मेळावा होणार असल्याने विभागानुसार तयारी करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे समोर आले आहे. मुंबईतील बीकेसी येथील मैदानावर एकनाथ शिंदे ही दसरा मेळावा घेणार असल्याची माहिती असल्याने शिंदे गटातील आमदार, पदाधिकारी तयारीला लागले आहे.
दरम्यान, दसरा मेळाव्याबाबत लक्ष्मी लॉन्स येथे उद्या होणारी बैठक ही मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.तसेच, मंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे यांच्यावर नाशिक विभागाची जबाबदारी देण्यात आली असून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना दसरा मेळाव्याला नेण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.