औरंगाबाद : उद्या पैठणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला आहे.
दानवे म्हणाले, “आदित्य ठाकरे यांच्या सभेला तुफान गर्दी झाली होती. मात्र पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीपान भूमरे यांच्या सभेला गर्दी झाली नाही. जेमतेम शंभर लोकही नव्हते.त्यामुळे आता शक्तिप्रदर्शन करण्यासाठी एकनाथ शिंदे हे पैठणमध्ये सभा घेत आहेत. मात्र सभेला गर्दी जमवण्यासाठी यांना भाड्यानं लोक आणावे लागत आहेत. सभेला येण्यासाठी प्रत्येकाला दीड हजार रुपये दिले जात असल्याचा दावा देखील अंबादास दानवे यांनी केला आहे.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठणमध्ये उद्या सभा होणार आहे. या सभेबाबत एक पत्र व्हायरलं झालं आहे. या पत्रातून अंगनवाडी सेविकांना मुख्यमंत्र्यांच्या सभेला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.मात्र, हे पत्र बनावट असून, यामाध्यमातून बदनामीचा प्रयत्न सुरू असल्याचे शिंदे गटाचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी म्हटले आहे.