नवी दिल्ली: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पन्नास मिनिटे चर्चा झाली. बिहारमध्ये काँग्रेस समर्थित महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर नितीश कुमार आणि राहुल गांधी यांची ही पहिलीच भेट होती.
तसेच, बिहारमध्ये नवे सरकार स्थापन झाल्यानंतर राहुल गांधी यांनी नितीश कुमार यांचे फोनवरून अभिनंदन केले होते. या दोन्ही नेत्यांची भेट वेळी झाली आहे, जेव्हा रविवारीच राहुल गांधींनी भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांना एकत्रित येण्याचे आवाहन केले होते. बिहारमध्ये सत्तापरिवर्तन झाल्यानंतर नितीश कुमारही विरोधी पक्षांना एकत्रित येण्याचे आवाहन करत आहे. दिल्लीत पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, त्यांना पंतप्रधान होण्याची इच्छा नाही. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपविरोधात लढा द्यावा, एवढीच माझी इच्छा आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, दिल्लीला जाण्यापूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालू प्रसाद यादव यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि राबडी देवी तेथे उपस्थित होत्या.