मुंबई : महाराष्ट्रातील लाखो लोकांना रोजगार देणारा वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला हलवण्यात आला. दरम्यान, एकीकडे वेदांता प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून गेल्यानंतर आता दुसरीकडे नाणारचा प्रकल्प रिफायनरी सुद्धा गुजरातला हलवणार असल्याची चर्चा सुरू झाली. या चर्चेवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
वेदांता प्रकल्पाबरोबरच आता नाणारचा रिफायनरी प्रकल्प सुद्धा महाराष्ट्रातून गुजरातला जाणार का? असा प्रश्न उद्योगमंत्री उदय सामंत यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, 'रिफायनरी प्रकल्प बाबत लोकांमध्ये गैरसमज पसरविले जात आहेत. रिफायनरी प्रकल्पाबाबत राज्यात अफवा पसरवण्याचे काम सुरू आहे. काही राजकीय लोक दुटप्पी भूमिका घेत आहेत. नाणारचा प्रकल्प कुठेही जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन महाराष्ट्रात आणखी नवीन उद्योजक आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत' उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.