मुंबई: अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या ऋतुजा लटके या उमेदवार म्हणून च्या मैदानात उतरल्या असून, त्यांची लढत भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्याशी होणार आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरे व भाजपची आणि शिंदे गटाचीही प्रतिष्ठापणाला लागणार आहे. मात्र, मतदार कुणाच्या बाजूने कौल देणार हे येत्या 6 नोव्हेंबर रोजीच्या निकालात दिसून येणार आहे.
ऋतुजा लटके या उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत असून, या निमित्ताने पहिल्यांदाच काही गोष्टी त्यांच्या बाबतीत घडणार आहेत. एक म्हणजे शिवसेना फुटीनंतर निवडणूक लढणाऱ्या त्या ठाकरे गटाच्या पहिल्या महिला उमेदवार ठरणार आहेत.
तसेच, या निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे गट मशाल चिन्हावर लढत आहे. पहिल्यांदाच मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्याचा मानही ऋतुजा लटके यांना मिळाला आहे. त्यामुळे मशाल चिन्हावर लढणाऱ्याही त्या ठाकरे गटाच्या पहिल्या कार्यकर्त्या ठरणार आहेत.