सध्या अनेकांना डोळ्यांच्या त्रासांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्स लावायची गरज पडत आहे. बरेच लोक चुकून कॉन्टॅक्ट लेन्स लावून झोपी जातात. पण त्यांचा परिणाम डोळ्यांवर होऊ शकतो.असे केल्याने डोळे सूजतात किंवा ते जास्त लाल होतात. अमेरिकेमध्ये राहणाऱ्या एकवीस वर्षीय माइक क्रुमहोल्झने कॉन्टॅक्ट लेन्स घालून झोपण्याची चूक केली. आणि हि चूक त्याला खूप महागात पडली.
माइक गेल्या सहा-सात वर्षांपासून लेन्सचा वापर करत आहे. या काळामध्ये तो अनेकदा नकळत कॉन्टॅक्ट लेन्स घालून झोपी गेला होता आणि त्यानंतर होणारे परिणाम देखील त्याने भोगले होते. पण यावेळेसची परिस्थिती गंभीर होती. काम करुन दमलेला माइक लेन्स घालून झोपला. लेन्समुळे त्याच्या उजव्या डोळ्यामध्ये मांस खाणारा अकांथामोबा केरायटिस (Acanthamoeba keratitis) नावाचा परजीवी विकसित झाला. या परजीवीमुळे त्याच्या डोळ्याची दृष्टी गेली.
त्याने वेगवेगळे नेत्ररोग तज्ञ आणि दोन कॉर्निया तज्ञ यांच्या भेटीनंतर डोळ्यामध्ये अकांथामोबा केरायटिस (Acanthamoeba keratitis) असल्याचे निदान झाले. डोळ्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या असून तो आत्ता घरी बसून आहे. पण त्याचे बाहेर जाणं बंद झालं आहे.त्यामुळे त्याने सर्वाना न चुकता कॉन्टॅक्ट लेन्स काढून झोपण्याचे आवाहन केले आहे. या संबंधित व्हिडीओ त्याने टिकटॉकवर पोस्ट केले आहेत.