![]() |
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आडतदाराकडून व्यापाऱ्यांची लुट सुरु असून याप्रकरणी बाजार समितीही आडतदारांना सामील असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला असून त्यांनी डाळिंब माल खरेदीवर बहिष्कार टाकला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, आटपाडी येथे बाजार समितीचे श्रीमंत बाबासाहेब देशमुख डाळिंब मार्केट यार्ड आहे. या ठिकाणी एकूण ४१ आडतदार आहेत. तर २६ व्यापारी आहेत. शेतकऱ्यांचे खराब झालेले डाळिंब विक्रीसाठी मार्केट यार्ड या ठिकाणी येते. व्यापारी ते शेतकऱ्यांच्या कडून खरेदी करून पुढे तो माल आडतदारांना दिला जातो.
सदरचा डाळिंब माल आडतदार यांनी खरेदी केल्यावर आडतदारांच्याकडून त्यावर प्रति क्रेट हमालीच्या नावाखाली १० रुपये लावले जातात. परंतु मार्केट कमिटीच्या कोणत्याची नियमामध्ये असे नसल्याने याला व्यापाऱ्यांनी विरोध करत त्यावर बाजार समितीकडे लेखी तक्रार दिली आहे. परंतु बाजार समिती जाणीवपूर्वक याकडे लक्ष देत नसल्याने याचा गैरफायदा आडतदारांनी घेत व्यापाऱ्यांना बाजार डाळिंब यार्डातून हुसकावून लावण्याचे प्रयत्न करत आहेत.
हमालीच्या नावाखाली प्रति क्रेट १० रुपये घेण्यात येतात हे बाजार समितीच्या सचिवांना सुद्धा माहित आहे. परंतु ते देखील याकडे कानाडोळा करत असून विरोध वाढला की, तात्पुरता यातून मार्गे काढून व्यापाऱ्यांना शांत बसवत आहेत. सदरचा गैरप्रकार हा गेली ०६ वर्षे सुरु असून आतापर्यंत आडतदारांनी व्यापाऱ्यांची कोट्यावधी रुपयांची लुट केली आहे. तसेच हे सर्व लुटलेले पैसे नेमके कोणाच्या खिशात जातात याचा देखील तपास करण्याची मागणी व्यापाऱ्यांच्याकडून केली गेली असून, सदरची बाब विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर कानावर देखील घालण्यात आली आहे.
कमिशन ६ टक्के असताना १० टक्के कपात
आडतदारांनी व्यापाऱ्यांच्याकडून डाळिंब खरेदीवर ०६ टक्के कमिशन घ्यावा असा बाजार समितीचा निर्णय आहे. परंतु आडतदार व्यापाऱ्यांच्याकडून १० टक्के कमिशन घेत असल्याचा आरोप केला असून याप्रकरणी आता पर्यंतची सर्व बिले व्यापाऱ्यांनी जपून ठेवली आहेत.
शेतकऱ्यांना लुटा पण १० रु. घ्या
आटपाडी बाजार समितीच्या डाळिंब मार्केट यार्डामध्ये खराब झालेले डाळिंबाच्या अंदाजे दररोज साधारपणे ३००० क्रेट डाळिंब माल विक्रीसाठी येत असतो. जे व्यापारी हे डाळिंब खरेदी करून आडतदारांच्याकडे माल घेवून जातात त्यावेळी हमालीच्या नावाखाली प्रति क्रेट १० रुपये घेतले जातात. याला व्यापाऱ्यांनी विरोध केला असता तुम्ही शेतकऱ्यांच्याकडून घ्या असा सल्ला दिला जातो. त्यामुळे ही शेतकऱ्यांची एकप्रकारे लुटच आहे.