सांगली: प्रेमात गुरफटलेल्या अल्पवयीन मुलीचा पित्याकडून खून झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील मंगरूळ येथे घडली असून याप्रकरणी विटा पोलिसात गुन्हा नोंद झाली असून पोलिसांनी खून करणाऱ्या पित्यास अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी, श्रेया संतोष जाधव (वय १७) हिचे नात्यातीलच तरूणाशी प्रेमसंबंध होते. यामुळे वडिल संतोष जाधव यांनी तिचे महाविद्यालयीन शिक्षणही थांबवले होते. मात्र, मुलगी महाविद्यालयाला जाण्याचा हट्ट करीत होती.
यासंदर्भात शनिवारी घरात मुलीची आई, वडील हे मुलीशी चर्चा करीत होते. वडिलांनी मुलाला भेटायचे नाही, त्याच्याशी संपर्क ठेवायचा नाही तरच महाविद्यालयाला जाण्यास परवानगी दिली जाईल असे सांगत होते, तर आईने अद्याप लग्नाचे वय नाही, वय पूर्ण झाल्यानंतर त्याच्याशी लग्न लावून देण्याची तयारीही दर्शवली.
मात्र, मुलगी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. यातून वाद झाल्यानंतर वडिल संतोष जाधव यांनी भाजी चिरण्याचा चाकू घेऊन मुलीवर वार केले. यात ती ठार झाली. या प्रकरणी मृत मुलीची बहिण किरण जाधव हिने विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलीसांनी संशयिताला अटक केली असल्याची माहिती निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.