Type Here to Get Search Results !

नाथबाबांच्या नावानं चांगभलं… ; खरसुंडीच्या सिद्धनाथाचा सासनकाठी व पालखी सोहळा उत्साहात संपन्नमाणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असणाऱ्या खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ यात्रेचा चैत्र सासनकाठी व पालखी सोहळा अमाप उत्साहात आज (दि.५) पार पडला. या सोहळ्याला सुमारे ४ लाखांहून अधिक भाविकांनी हजेरी लावली.


यात्रेसाठी शनिवारी मध्यरात्री पासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली होती. या सोहळ्यामध्ये चैत्र वद्य दशमीला देवाची लोखंडी सासने धावडवाडीचे मुस्लिम व विठलापूरचे बाड यांनी स्नानासाठी घोडेखूर येथे नेली. त्यानंतर ती जोगेश्वरी मंदिरात परत आणली. आज सकाळी सासनकाठी व पालखी ने मिरवणुकीच्या सोहळ्यास सुरवात झाली. पहाटे मुख्य मंदिरात अभिषेक झाल्यानंतर श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी देवीची पूजा बांधण्यात आली होती. आठवडाभर मंदिरात सेवा करणारे भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अकरानंतर गावोगावच्या सासनकाठ्या मुख्य मंदिरात दाखल होऊ लागल्या. मंदिराच्या आवारात सासनकाठ्या आल्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचवण्यात येत होत्या.


यावेळी गावोगावच्या मानकऱ्यांना मंदिरात निमंत्रित करण्यात आले. दोन वाजता धावडवाडीच्या मुस्लीम व विठलापूरच्या हिंदू मानकऱ्यांनी एकत्र नैवेद्य अर्पण केला. दुपारी दोन वाजेपर्यंत मोठी गर्दी झाली. २.३० वाजता देवस्थानचे प्रमुख मानकरी माजी सभापती हर्षवर्धन देशमुख यांचे हस्ते पालखी पूजन व दर्शन झाल्यानंतर चांगभलंच्या जयघोषाने चिंचणी, तासगाव, जाधववाडी येथील मानकऱ्यांनी पालखी उचलून मुख्य सोहळ्यास सुरवात केली. 


यात्रेसाठी आटपाडी आगारातून खरसुंडी, भिवघाट, सांगोला येथे जादा बस सोडण्यात आल्याने भाविकांची मोठी सोय झाली. मंदिरात आरोग्य विभागाने अत्यावश्यक सेवा म्हणून वैद्यकीय पथक ठेवले होते. मुख्य पेठेत घरावरून गुलाल खोबरे उधळण्यास पोलिसांनी मनाई केली होती. पोलिसांचा मोठा फौजफाटा यात्रा सुरक्षेसाठी तैनात करण्यात आला होता.


 
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies