Type Here to Get Search Results !

‘माथेरानच्या राणी’च्या आता वाढीव सेवा; पर्यटकांसाठी ट्रेनच्या ३१ मे पर्यंत अधिक फेऱ्या



मुंबई : माथेरानच्या मिनी ट्रेनचे पर्यटकांना कायमच आकर्षण असून या ‘राणी’ला गेल्या वर्षभरात पर्यटक आणि स्थानिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ही बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वेने माथेरान मिनी ट्रेनच्या फेऱ्यांमध्ये सोमवार ते शुक्रवारी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. माथेरानमध्ये देशभराच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर विदेशातील पर्यटकही येत असतात. या पर्यटकांना माथेरान मिनी ट्रेन कायमच आकर्षित करीत असते. या मिनी ट्रेनला व्हिस्टाडोम डबाही जोडण्यात आला आहे. स्थानिकांनाही या ट्रेनची खूप मदत होते. टाळेबंदीच्या काळात माथेरान मिनी ट्रेनची सेवा बंदच होती. टाळेबंदी शिथिल होताच काहींनी पर्यटनासाठी माथेरानमध्ये जाणे पसंत केले. परंतु बंद असलेल्या मिनी ट्रेनमुळे र्पयटकांचा हिरमोड होत होता.

 

स्थानिकांनाही नेरळ – माथेरान प्रवासासाठी अमन लॉजपर्यंत टॅक्सी आणि नंतर पायपीट करावी लागत होती. अखेर नोव्हेंबर २०२० पासून माथेरान ते अमन लॉज शटल सेवा सुरू करण्यात आली.  सध्या अमन लॉज आणि माथेरानदरम्यान मिनी ट्रेनच्या सोमवार ते शुक्रवार अशा अप आणि डाऊनला एकूण १६ शटल फेऱ्या, तर शनिवार आणि रविवारी अप व डाऊनला मिळून २० शटल फेऱ्या होतात. सोमवार ते शुक्रवारीही गर्दी होत असल्याने या दिवसांत चार फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. माथेरानच्या दिशेने दोन, तर अमन लॉजच्या दिशेने जाण्यासाठी दोन फेऱ्यांचा यात समावेश आहे. त्यामुळे सोमवार ते शुक्रवारी दररोज एकूण १६ ऐवजी २० फेऱ्या होतील.  २०२१-२०२२ मध्ये तीन लाख सहा हजार पर्यटक आणि स्थानिकांनी या ट्रेनमधून प्रवास केला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies