Type Here to Get Search Results !

कारवाई ऐवजी आता लोकशिक्षणावर भर, टाळेबंदीत नियुक्त क्लिन अप मार्शलना सोडचिठ्ठी!


 


मुंबई : करोनाच्या प्रादुर्भावापासून संरक्षण व्हावे यासाठी मुखपट्टी बंधनकारक करण्यात आली मात्र यापुढे मुखपट्टी न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याऐवजी लोकशिक्षणाचा मार्ग अवलंबिण्याचा पवित्रा पालिका प्रशासनाने घेतला आहे. दंडात्मक कारवाईची धार बोथट होण्याच्या भीतीपोटी प्रशासनाने आता नवी भूमिका घेण्याच्या विचारात आहे.


करोनाकाळात स्थायी समितीने दिलेल्या विशेषाधिकाराचा वापर करून नियुक्त केलेल्या क्लिन अप मार्शलची गच्छंती करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून रितसर निविदा मागवून नव्या क्लिन अप मार्शलची नियुक्ती करण्यात येणार आहे. मात्र त्यांच्याकडे स्वच्छताविषयक कामांची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.


करोना संसर्गानंतर टाळेबंदीत नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टीचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले. मुखपट्टीचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश पालिकेने दिले. मात्र अपुऱ्या मनुष्यबळाची बाब लक्षात घेत ही कारवाई करण्यासाठी पालिकेच्या विभाग कार्यालयस्तरावर आवश्यकतेनुसार क्लिन अप मार्शलची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर मुंबईत मुखपट्टीविना फिरणाऱ्यांविरुद्ध मोठय़ा प्रमाणावर दंडात्मक कारवाई सुरू झाली. मुखपट्टीविना फिरणारे नागरिक आणि क्लिन अप मर्शल यांच्यामध्ये कारवाईवरून काही ठिकाणी वादही झाले.


 मुंबईमधील तिसरी लाट ओसरली असून टाळेबंदीनंतर घालण्यात आलेले निर्बंधही हटविण्यात आले आहेत. मुंबईतील सर्व कारभार हळूहळू पूर्वीसारखे  होत आहे. त्याच वेळी नव्या करोनाबाधित रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. आता मुखपट्टीच्या बंधनातून मुक्त करावे, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनानेही थोडे नरमाईचे धोरण अवलंबून मुखपट्टीचे बंधन थेट शिथिल करण्याऐवजी या संदर्भात लोकशिक्षणावर भर देण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे.



नव्या संस्थांची नियुक्ती  क्लिन अप मार्शलना सेवेतून कमी केल्यानंतर निर्माण होणारी पोकळी भरून काढण्यासाठी प्रचलित पद्धतीनुसार अस्वच्छता करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी संस्थांची नियुक्ती करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. नियुक्त संस्थेला क्लिनअप मार्शल तैनात करावे लागणार आहेत. प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीत एका संस्थेची नियुक्ती करण्यात येणार आहे. काही संस्थांची एकापेक्षा अधिक विभाग कार्यालयांच्या हद्दीसाठी नियुक्ती करण्यात येईल, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.



 मुखपट्टीविना फिरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याऐवजी मुंबई अस्वच्छता करणारे, कचरा टाकणारे, थुंकणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची जबाबदारी नव्याने नियुक्त करण्यात येणाऱ्या संस्थांच्या क्लिनअप मार्शलवर सोपविण्यात येईल, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies