खून सत्रात हादरले नाशिक

 नाशिक : शहरात खूनसत्र सुरूच असून दोन दिवसांत तब्बल चार खून पडले आहेत. गुरुवारी झालेल्या दोन घटनांच्या तपासाला गती मिळत नाही तोच आनंदवली शिवारात प्रथमेश रतन खैर या विद्यार्थ्यांचा मृतदेह आढळून आला  तर शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास हरीश भास्कर पाटील या प्रवाशाचा खून झाला.


शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता हरीश पाटील पुण्यावरून आलेल्या बसमधून उतरून पायी जात होते. द्वारका परिसरातील पौर्णिमा बसस्टॉपजवळ पाटील यांना एका दुचाकीचा धक्का लागला. त्यामुळे दुचाकीस्वार आणि पाटील यांच्यात वादविवाद झाला. या वेळी टोळक्यातील एकाने पाटील यांच्यावर चाकूने वार केले. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी संशयित अशोक दत्ता हिंगे, नदीम सलीम बेग २३, रोहित अशोक पताड, शुभम दिलीप घोटेकर यांना ताब्यात घेतले; तर त्यांचा अन्य एक सहकारी फरार आहे.


या प्रकरणी संशयित सागर चित्तलकर, शुभम उगलमुगले, शंतनू देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आनंदवली शिवारातील बेंडकुळेनगरमध्ये गुरुवारी सायंकाळी ५.१५ च्या सुमारास काही नागरिकांना बेवारस दुचाकी व एक बॅग पडलेली दिसली. जवळच मृतदेह पडलेला होता. याबाबत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. यावेळी मृतदेहावर मारहाण केल्याच्या खुणा आढळून आल्याने खून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.


दरम्यान, मुलाच्या हट्टीपणाला कंटाळून बापाने मुलाचा खून करीत स्वत: गळफास घेतल्याची घटना पंचवटीतील शिवाजी चौक परिसरात गुरुवारी उघडकीस आली. या प्रकरणी गळफास घेणाऱ्या जगदीश पुंडलिक जाधव ४८ यांच्यावर मुलगा प्रणव जाधव १७ याच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आकाश पेट्रोल पंपाजवळ बुधवारी रात्रीच्या सुमारास २४ वर्षीय यश रामचंद्र गांगुर्डे याचा मित्रांनी चॉपरने वार करून यशचा खून केला.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured