“...म्हणून मी नेतेपदाचा राजीनामा देतोय”: रामदास कदमांनी दिला शिवसेना नेतेपदाचा राजीनामा!



रत्नागिरी : शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. कदम यांनी त्याबाबतचे पत्र माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. शिवसेना पक्षात घुसमट होत असल्याने राजीनामा देत आहोत असे कदम यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे. 



रामदास कदम यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेते पदी नियुक्ती केली होती. मात्र, शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहिली नाही, हे मला पहायला मिळाले. आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचे काम आपल्याकडून कधीच झाले नाही. उलटपक्षी मला व माझा मुलगा आमदार योगेश कदम याला अनेक वेळा अपमानित करण्यात आले.



विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आपण मला अचानक मातोश्रीत बोलावून घेतले आणि मला आदेश दिलेत की यापुढे तुमच्यावरती कोणीही कितीही टीका केली किंवा पक्षावर काही बोलले किंवा माटोश्रीवर कोण काही बोललं तरी आपण मिडीयासमोर अजिबात जायचे नाही. मिडीयासमोर कुठलेही वक्तव्य करायचे नाही. यामागचे कारण मला आजपर्यंत कळू शकले नाही. गेली तीन वर्ष तोंड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करीत आहेत. ज्या ज्या वेळी शिवसेनेवरती संकटे आली त्या वाईट काळामध्ये माझा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक त्याचा साक्षीदार आहे.



सन 2019 कालावधीत आपण राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस साेबत सरकार बनवत हाेतात. त्याही वेळी मी आपल्याला हात जाेडून विनंती केली हाेती की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेस साेबत संघर्ष केला. हिंदुत्व टिकवलं. राष्ट्रवादी व काॅंग्रेस साेबत युती करु नका, ती बाळासाहेबांच्या विचाराची प्रतारणा हाेईल अशी आपल्याला विनंती केली हाेती. पण आपण त्याही वेळी माझं एेकलं नाही याचेही दुख मनात आहे. शिवसेना प्रमुख असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती. आणि म्हणून मी आज शिवसेना नेता या पदाचा राजीनामा देत आहे असे वक्तव्य कदम यांनी पत्रातून जाहीर केले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured