Type Here to Get Search Results !

मराठी भाषा दिन जिंदाबाद ....!


मराठी भाषा दिन जिंदाबाद ....!


मराठी भाषा दिन त्यानिमित्त एक आनंदाची बातमी ऐकायला व वाचायला मिळाली आणि मराठी भाषेवरचे कमी होत चाललेले प्रेम पुन्हा उफाळून आलं. अक्षरशा मराठी भाषेला मिठी मारून गहीवरुन (प्रेमाने) रडावं असं वाटू लागलं होतं. कारण महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला मराठी भाषा दिन माहीतच नव्हता. आज त्याचं दर्शन झालं. महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड यांनी घोषणा केली. शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून महाराष्ट्रातील सर्व मंडळाच्या व माध्यमांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये मराठी हा विषय सक्तीचा नव्हे आवश्यक करण्यात येणार आहे. आज तरी मराठी हा भाषा विषय सर्व शाळांमध्ये आवश्यक नसला तरी सरकारचे सर्व क्रियाकर्म, कर्मकांड पूर्ण केल्यानंतर मात्र मराठी भाषा विषय किमान महाराष्ट्रातील सर्वांना प्रेमाने आवश्यक शिकवावा लागेल. त्यानंतर भविष्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या पिढ्या (गरीब व ग्रामीण) मायबोली मराठीचे गोडवे नियमितपणे गात राहतील, यात मुळीच शंका नाही. 
‘मराठी’ ही महाराष्ट्राची मातृभाषा व प्रादेशिक भाषा असतानाही, ती शिकण्यासाठी कायद्याने सक्ती का करावी लागते? ही वेळ कोणी आणली? मराठी भाषा संपवण्याचा प्रयत्न कोणी केला? महाराष्ट्रात व देशात मराठी भाषा जिवंत नाही का? असेल तर ती कोणामुळे? नसेल तर कोण आहेत मायबोली मराठीचे ते मारेकरी? पुन्हा मराठी भाषा महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण जगामध्ये बहरदार, सुगंधित व संपन्न बनविण्यासाठी काय करावे लागेल? 
होय मराठी भाषा आमची मायबोली तर आहेच. पण जन्म देणाऱ्या आई बरोबर मिळालेली देणगी सुद्धा आहे. ती अखंड आपल्या सोबत राहणार आहे तरीसुद्धा स्वतःच्या घरातच म्हणजे महाराष्ट्रातच मराठी भाषेची उपेक्षा होत आहे हे सत्य यानिमित्ताने समोर आलं आहे. ही अपेक्षा व दुरावस्था करणारी मंडळी दुसरी-तिसरी अन्य कोण नसून एक पांढरपेशी व्यवस्था आहे. त्यामध्ये राजकारणी पुढारी मंत्री आमदार खासदार अधिकारी नोकरदार वर्ग व्यापारी व श्रीमंत यांचा समावेश आहे. या पांढरपेशी वर्गानेच मराठी भाषेला संपविण्याचा जणू विडाच उचलला आहे की काय ? असे वाटते. कोण आहेत, ज्यांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळांना बेफाम मान्यता देऊन मराठी माध्यमांच्या शाळांच्या कडे समाजाला पाठ फिरवायला भाग पाडले. सरकार आणि सरकारमधील मंत्री महोदय याला जबाबदार आहेत. खोट्या प्रतिष्ठेसाठी व पैशाचा माज जिरवून घेण्यासाठी यांनीच आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पाठवून मराठी मातृभाषेकडे पाठ फिरवण्यास भाग पाडले आहे. याच लोकांनी इंग्रजी भाषेला अवास्तव महत्त्व दिलं व मराठी भाषेची अवहेलना केली. मराठी माध्यमांच्या शाळेत आपल्या मुलांना शिक्षण देणाऱ्या महोदयांना कमीपणाचं व लाजिरवाणं वाटतं, एवढंच नाहीतर, माय मराठीचे नाव घेऊन माधोगिरी मागणाऱ्या राजकारण्यांची मुलं मराठी माध्यमांच्या शाळेत शिकत नसावीत, यापेक्षा मोठे दुर्दैव काय आहे? आज मराठी भाषेचे अस्तित्व समाजामध्ये शालेय व महाविद्यालयीन स्तरावर शिल्लक आहे, ते केवळ ग्रामीण भागातील गरीबांच्या, शेतकऱ्यांच्या व कष्टकऱ्यांच्या मुलामुळे,कारण इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी त्यांच्याकडे भरमसाठ पैसा नाही. त्यामुळे का असेना, पण त्यानी मराठीचा उद्धार करण्याचा प्रयत्न केला आहे. मध्यंतरीच्या काळात प्राथमिक व माध्यमिक शालेय स्तरावर व आज महाविद्यालय स्तरावर मराठी भाषेची व  भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी काय, पण शिक्षकांना एखादं मराठीमध्ये पत्र लिहिण्यास सांगितलं तर, त्याच्या मराठी भाषेची अवस्था लक्षात येईल . त्यांना एखाद्या विषयावर बोलायला सांगितलं, तरी मराठी भाषेची दुरवस्था लक्षात येईल. आज मराठी भाषेचे अध्ययन करणाऱ्या मुलांचा अभ्यास करायचं ठरवलं तर, त्याला व्यवस्थित मराठी बोलता, लिहिता,वाचता येत नाही आणि इतरांनी बोललेलं व्यवस्थित समजत नाही. आजही मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या दहावीच्या मुलांना बोर्डाच्या परीक्षेत इतर सर्व भाषा पैकी मराठीला सर्वात कमी गुण मिळतात. मला भाषा- भाषा यांच्यामध्ये भेद-भाव करायचा नाही किंवा कोणती श्रेष्ठ, कोणती कनिष्ठ याचाही विषय नाही, पण स्वतःच्या घरात, माणसात मराठी भाषेची एवढी दुरावस्था व्हावी याचं वाईट वाटतं. महाराष्ट्रात मराठी भाषेचे केवळ उदात्तीकरण करून राजकारण करणारे, सत्ता-संपत्ती कमवणारे, भाषिक दंगली भडकवणारे खऱ्या अर्थाने मराठी भाषेचे खच्चीकरण करत असतात. याच लोकांच्या कडून भविष्यातही मराठी भाषेच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो. तेव्हा आता तरी महाराष्ट्रातील सरकार व जनता यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी व रक्षणासाठी मराठी भाषेतून शिक्षणास प्राधान्य द्यावं. मराठी मधून उत्तम साहित्य लिहावे, जेणेकरून ते साहित्य वाचण्यासाठी इतर भाषेच्या लोकांनी मराठी भाषे वरती प्रेम करावं. कलेच्या क्षेत्रात मराठीला मोलाचे स्थान द्यावे. केवळ प्राथमिक व माध्यमिक शाळेतच मराठी सक्तीची करण्याऐवजी, महाविद्यालयीन विद्यार्थी व साहित्याचे संशोधन करणाऱ्यांनी मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी योगदान द्यावे. कारण मराठी भाषा ही आपली दुसरी माता आहे, जिला आपण मातृभाषा म्हणतो. तिच्या अस्तित्वासाठी समाजातील सर्वांनी योगदान देऊन तिला राजभाषाच नाही, lतर विश्वभाषा म्हणून समृद्ध बनण्याची शपथ घेऊया.


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies