Type Here to Get Search Results !

वंचित आघाडीतील राजीनामे व राजकारण 


वंचित आघाडीतील राजीनामे व राजकारण 
महाराष्ट्रात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीनंतर तिसरी राजकीय शक्ती म्हणून उदयास आलेल्या वंचित बहुजन आघाडी मधील 45 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे व पक्षाच्या सदस्यत्वाचे राजीनामे  प्रकाश आंबेडकर यांच्याकडे पाठवल्याची माहिती समजल्यावर दोन प्रश्न मनात निर्माण होतात ? त्यापैकी पहिला प्रश्न असा, ' या 45 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यामुळे बहुजन वंचित आघाडीचे  फार मोठे नुकसान झाले का ? '  दुसरा प्रश्न म्हणजे ' या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी होण्याऐवजी त्यांनी राजीनामे दिले, त्यामुळे त्या 45 नेत्यांनी पक्षाच्या हिताचे काम केले का ? या दोन्ही प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, असे निदर्शनास येते की राजकारणामध्ये काम करत असताना काही पक्षाची ध्येय-धोरणे समाजकारणातून राजकारण करणे अशी असतात; तर काही पक्षांची ध्येय-धोरणे राजकारणातून समाजकारण करणे अशी असतात . त्याही पुढे जाऊन काही पक्षाची ध्येय-धोरणे फक्त आणि फक्त राजकारण करणे एवढेच असते . जी माणसे व पक्ष समाजकारणातून राजकारण करत असतात, त्यांच्या राजकारणाचा पाया समाजकारण असते. त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते समाजकार्य करत-करत मोठे होतात व राजकारणात प्रवेश करतात. त्यांना समाजकारण व राजकारण दोन्ही क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवता येतो. राजकारणात अशी माणसे कितीही मोठ्या पदावर गेली तरी, ती समाजकार्याला विसरत नाहीत. राजकारणात ती समाजसेवेलाच प्राधान्य देतात. वेळप्रसंगी राजकारण आणि समाजकारण यापैकी एकाचा त्याग व एकाचा स्वीकार करावा लागला , तर ते राजकारणाचा त्याग करतील व समाजकारणाशी बांधील राहतील. समाजकार्य करीत असताना एखाद्या राजकीय पदाचा त्याग करावा लागला तरी ही,  ही  माणसे मागेपुढे पाहत नाहीत.  या पक्षाची व त्यांच्या कार्यकर्त्यांची ध्येय-धोरणे राजकारणातून समाजकार्य करणे अशी असतात. या पक्षात समाजकार्याला दुय्यम स्थान असते.  हे कार्यकर्ते राजकारणाला प्रथम प्राधान्य देतात. त्यांची अशी अपेक्षा असते की, राजकारणात एखादे पद मिळाल्यानंतर त्याच्या सहाय्याने समाजकार्य करता येते . या प”क्ष्यांचे” कार्यकर्ते वेळप्रसंगी समाज कारणाकडे लक्ष देतीलच याची खात्री नाही, पण सत्ताप्राप्तीसाठी समाजाला वेग-वेगळी आश्वासन देण्यास मात्र मागे-पुढे पाहत नाहीत. ही आश्वासने पाळली जातीलच याची खात्री मात्र देता येत नाही . यांच्या पाठीमागे जे जनमत असते ते ही राजकीय सत्तेची लालसा असणारेच असते. ही माणसे राजकारणासाठी काही ही करण्यासाठी तयार असतात. या व्यक्तींना पक्षहित, देश व समाज या बाबी विशेष महत्त्वाच्या नसतात. मात्र राजकीय सत्ता मिळाल्यानंतर समाजाच्या विविध समस्या सोडवण्याची आश्वासन द्यायला मात्र ही मंडळी मागेपुढे पाहत नाही. ज्या पक्षाचे ध्येय- धोरण फक्त राजकारणच करणे, एवढेच असते अशा पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे संपूर्ण लक्ष्य राजकीय सत्ता हस्तगत करण्याकडेच असते. त्यासाठी ही मंडळी कोणत्याही थराला जातात. साम-दाम-दंड-भेद अनैतिकता इत्यादी मार्गाचा वापर करून सत्ता हस्तगत करतात. ही मंडळी दहशतीच्या माध्यमातून, पैसे वाटप करून, निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार करून व प्रशासनाशी संगणमत करून सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करतात. यांना समाज, देश, संस्कृती व नैतिकता यांच्याशी काहीही देणं-घेणं नसतं. त्यांची स्पष्ट भूमिका असते की, काहीही झालं तरी आपल्याला सत्ता मिळालीच पाहिजे, प्रसंगी विचार बदलले तरी हरकत नाही; तत्त्वे बदलली तरी हरकत नाही; पक्ष बदलला तरी हरकत नाही; पण सत्ता मात्र मिळालीच पाहिजे. वंचित बहुजन आघाडी या पक्षाची स्थापना मुळात सामाजिक कार्यातून झालेली आहे. या पक्षाचे धोरण समाजकारणातून राजकारण असे आहे. वंचित बहुजन आघाडी मध्ये समाविष्ट केलेला भारिप बहुजन महासंघ हा पक्ष सामाजिक कार्यातून उदयास आला आहे, कारण या पक्षाने वंचित व बहुजन समाजातील विविध जाती, विविध पुरोगामी विचारधारा व विविध धर्म या सर्वांची एक मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे. या वेगवेगळ्या विचार प्रवाहातील व जाती-धर्मातील बहुजन समाजातील नेते मंडळींना एकत्र करताना काही मंडळी समाजकार्याला प्राधान्य देणारी असतील, ही माणसे सत्ता, संपत्ती , प्रतिष्ठा व स्वार्थ यापेक्षा समाजकार्याला महत्व देतात व पक्षाशी एकनिष्ठ राहतात.  काही माणसे राजकारणाला प्राधान्य देणारी असतात. ही माणसे मात्र सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा व स्वार्थ या गोष्टी मिळवण्यासाठीच पक्षात येतात. जर एखाद्या पक्षात या गोष्टी मिळाल्या नाहीत, तर पक्षांतर करून दुसऱ्या पक्षात जातात. अशा व्यक्तींना तत्व विचार व कर्तव्य यांचे कसलेही अधिष्ठान नसते. ही माणसे कधीही कोणताही पक्ष सोडतात व कोणताही पक्ष कधीही पकडतात. एवढेच नाही तर असले राजकारण करणारी घराणे महाराष्ट्राच्या आहेत, की सत्तेसाठी मुलगा एका पक्षात,  बाप दुसऱ्या पक्षात तर आई तिसऱ्या पक्षात, अशी स्थिती आहे. कदाचित वरील वंचित बहुजन आघाडी मधून जे पंचेचाळीस पदाधिकारी राजीनामा देऊन बाहेर पडले, त्यांना खरंतर पक्षच त्यांच्यावर हकालपट्टीची कार्यवाही करणार होता. कारण ही मंडळी फक्त आणि फक्त सत्तेसाठीच पक्षात आली होती. त्यांना तत्वाचं, स्वाभिमानाचं व समाजकारणाचे काही एक देणं-घेणं नव्हतं. प्रकाश आंबेडकरांच्या तात्विक व स्वाभिमानी बांधल्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्याशी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जुळलं नाही, तेव्हा या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आले की आपणास आता आमदारकी किंवा खासदारकी यासारखी सत्तेची पदे मिळणं दुरापास्त आहे. विशेष म्हणजे या महाशयांनी या पक्षाच्या माध्यमातून यापूर्वी आमदारकी व विविध पदे भोगलेली आहेत , पण त्यात त्यांना समाधान नव्हते. कारण सत्तेच्या आमिषाने झपाटलेली माणसे नितीमान, व विचारवंत असतातच असे नाही. अशा मंडळीपैकी वरील 45 पदाधिकारी असावेत असे वाटते.


दैनिक माणदेश एक्सप्रेस Free whatasapp वर Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies