केसरी कार्डधारकांना 25 एप्रिल पासून रेशनवर धान्य वितरण सुरू होणार : जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे


केसरी कार्डधारकांना 25 एप्रिल पासून रेशनवर धान्य वितरण सुरू होणार : जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली :  कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कोणीही उपाशी राहू नये यासाठी शासन सर्वतोपरी खबरदारी घेत आहे. यामध्ये एपीएल केसरी रेशन कार्डधारकांसाठी जे राष्ट्रीय अन्नसुरक्षा यादीमध्ये येत नाहीत,ज्यांना दरमहा धान्य मिळत नाही अशांसाठी  राज्यशासनाने योजना सुरू केली असून मे आणि जून महिन्यामध्ये केसरी कार्डधारकांना कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ वितरित करण्यात येणार आहे . यामध्ये ८ रुपये किलो प्रमाणे गहू तर 12 रुपये किलो प्रमाणे तांदूळ असे धान्य वितरण 25 एप्रिल पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी दिली. 
हे धान्य केवळ मे आणि जून या दोन महिन्यांसाठी वितरित करण्यात येत असून 25 एप्रिल पासून पाच मेपर्यंत सदरचे धान्य वितरित करण्यात येईल आणि त्यानंतर प्राधान्य आणि अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना त्यांचे नियमित धान्याचे वितरण मशीनद्वारे लगेचच वितरित करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 
एपीएल केसरी कार्ड धारकांचे धान्य वितरण हे ऑफलाईन पद्धतीने करण्यात येणार असून यामध्ये दुकानदार रजिस्टर मेंटेन करतील. या योजने अंतर्गत देण्यात येणार्या धान्याचे वितरण हे अत्यंत पारदर्शी करण्यासाठी ग्रामीण स्तरावरील पुरवठ्याच्या दक्षता समितीने काटेकोर काळजी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. रेशनिंगवरील धान्य पुरवठ्याच्या अनुषंगाने माहिती देताना वसुंधरा बर्वे म्हणाल्या, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत दोन प्रकारच्या कार्डधारकांना धान्य वितरण करण्यात येते. यात प्राधान्य कुटुंब लाभार्थी आणि अंत्योदय धान्य योजनेच्या लाभार्थ्यांना नियमित धान्य वितरण करण्यात येते. जिल्ह्यात 3 लाख 94 हजार 227 कार्डधारक या योजने मधले आहेत. एप्रिलमध्ये 3 लाख 87 हजार 971 कार्डधारकांना जवळपास 9200 मेट्रिक टन धान्य वाटप झाले आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत तांदूळ एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांसाठी अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील कार्डधारकांना प्रत्येक कुटुंबातील प्रति व्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत वितरीत करण्यात येणार आहे. हा मोफतचा तांदूळ केसरी कार्डधारकांना वितरित करण्यात येणार नाही. केवळ प्राधान्य कुटुंब योजना आणि अंत्योदय अन्न योजना अंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी याचे वितरण करण्यात येत आहे , असे स्पष्ट करून वसुंधरा बार्वे यांनी एप्रिल महिन्यातील हा तांदूळ जवळपास 82 टक्के लोकांना वितरित करण्यात आल्याचे सांगितले.
रेशनिंगचे धान्य घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये एक मीटर अंतरावर दुकानांसमोर मार्किंग करण्यात आले आहे त्याच ठिकाणी उभे रहावे सोशल डिस्टन्स पाळणे अनिवार्य असून धान्य घेण्यासाठी येताना मास्क घालणेही अनिवार्य असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured