कोरोना चे संकट व गुंडगिरी 


कोरोना चे संकट व गुंडगिरी 
आजच्या घडीला कारोनाच्या महामारीने जगात भयानक थैमान घातलेले असताना, आपल्या देशातील व राज्यातील प्रशासनाने मात्र कोरोना या संसर्गजन्य रोगावर मात करण्यासाठी व्यवस्थितपणे व योग्य नियोजन केलेलं आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, आरोग्य विभाग, वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, नर्स, कर्मचारी, प्रशासन व पोलिस यंत्रणा हे सर्वजण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोनाच्या विरुद्ध रात्रंदिवस लढत आहेत. पंतप्रधान, मुख्यमंत्री व त्यांचे सर्व सहकारी देशातील व राज्यातील जनतेला अहोरात्र घरातून बाहेर न पडण्याची विनंती करीत आहेत. शहरातून, गावातून व प्रत्येक गल्लीबोळातून शासनाचे प्रतिनिधी ' घरात रहा- सुरक्षित रहा ' हे आवाहन करीत आहेत. या प्रशासनाच्या आवाहनाला देशातील व राज्यातील जवळ-जवळ 90 टक्के जनता प्रतिसाद देत आहे, कारण त्यांना माहित आहे की, जर आपण सरकारच्या आदेशाचे व सूचनांचे पालन केले नाही, तर कोरोनाचे विषाणू आपला व आपल्या कुटुंबांचा कधी गळा घोटतील हे कळणार सुद्धा नाही. जर आपण, आपले कुटुंब व देश यांना कोरोनाच्या विषाणू पासून वाचवायचे असेल, तर शासनाचे आदेश व सूचना यांचे गांभीर्याने पालन केले पाहिजे. या 90 टक्के जनतेच्या सहकार्यामुळेच खऱ्या अर्थाने आज या महामारीला तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करणे अशक्य झाले आहे. परंतु महाराष्ट्र राज्यातील व विशेषता देशातील दहा टक्के महाभाग मात्र सरकारचे आदेश व सूचना यांच्याकडे गांभीर्याने लक्ष देत नसताना दिसत आहेत. 
वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम, लग्नसमारंभ, बाजार,  दुकाने इत्यादी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून कोरोनाच्या संसर्गास संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. एकीकडे सरकार, प्रशासन, वैद्यकीय यंत्रणा, पोलिस, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था व सर्वसामान्य जनता कोरोनापासून देशाला वाचवण्यासाठी जिवाचे रान करीत आहेत, तर दुसरीकडे काही मंडळी कोरोना सारख्या महामारी कडे दुर्लक्ष करून बिनकामाचे रस्त्याने व  मोटारसायकल वरून फिरून, चौकाचौकात घोळका करून कोरोनला आमंत्रण देण्याचा प्रयत्न करीत आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने कायदेशीर बडगा उचलला आहे. जमावबंदी, संचारबंदी व 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन सारखे आदेश जाहीर केले आहेत. परंतु या लोकांच्यावर कायद्याचाही तीळ मात्र परिणाम होत नाही, हे लक्षात येते. सरकारने अशा लोकांच्यावर कठोर कारवाईचे आदेश पोलिसांना दिलेले आहेत. यासाठी पोलिसांनी आपल्या दांडक्याचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रिकामटेकड्या फिरणाऱ्या व समाजाचे स्वास्थ्य बिघडवण्यास हातभार लावणाऱ्या लोकांची पळता भुई थोडी झाली आहे. 
याचा परिणाम असा झाला आहे की, बिगरकामाचे घरातून बाहेर फिरणाऱ्या लोकांचे प्रमाण १० टक्के होते, हे प्रमाण आता कमी होऊन ५ टक्क्यांवर येऊन ठेपले आहे. जेव्हा उरलेल्या पाच टक्के मोकाट फिरणाऱ्या लोकांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न सरकार, जनता व पोलिस विभाग करीत आहे, तेव्हा मात्र या पिसाळलेल्या मोकाट फिरणाऱ्या लोकांनी पोलिस, वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेवक यांच्यावर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. याचे उदाहरण म्हणजे अहमदनगर मध्ये औषध फवारणी करण्यासाठी गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यावर हल्ला केला आहे. त्याचबरोबर बीडमध्ये सर्वसामान्य जनतेला औषध उपलब्ध करून देणाऱ्या एका मेडिकल चालका मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर मध्यप्रदेशातील इंदोर मध्ये कोरोनाची तपासणी करण्यासाठी गेलेल्या एका वैद्यकीय अधिकाऱ्यावर अशा गुंडाच्याकडून हल्ला करण्यात आला आहे. महाराष्ट्रात वसई, पालघर, पुणे, धारावी व कोल्हापूर इत्यादी ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. सरकारच्या जमावबंदी, संचारबंदी व लॉकडाउन आदेशाचे पालन न करणाऱ्या लोकांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पोलीसांच्यावरच उलटे या लोकांनी जीवघेणे हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. कोरोनाच्या महासंकटातून जनतेला वाचवण्यासाठी प्रयत्न करणारे डॉक्टर, आरोग्य सेवक व पोलिस यांच्यावर जर अशा मोकाट फिरणाऱ्या लोकांच्याकडून हल्ले होऊ लागले, तर ही बाब अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे. स्वतःच्या जीवनाची पर्वा न करता, शासकीय यंत्रणा जनतेला कोरोनाच्य महामारीपासून वाचवण्याचा प्रयत्न करित आहे, त्यांच्यावर हल्ले करणारे गुंड कोण आहेत? याचा शोध घेतला पाहिजे. अहमदनगर मध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यावर हल्ला करणारे हल्लेखोर कोण? जेव्हा कर्मचारी औषध फवारणी करण्यासाठी गेले, तेव्हा त्या नातेवाईकांनी कर्मचाऱ्यांना आग्रह केला की, आम्हाला औषध फवारणीचा प्रारंभ करताना चे फोटो काढायचे आहेत. तेव्हा आज फवारणी करण्याऐवजी उद्या औषध फवारणी करण्यासाठी या. पण कर्मचाऱ्यांच्या कडे वेळ नसल्यामुळे त्यानी औषध फवारणीस सुरुवात केली. तेव्हा नगरसेवकाच्या नातेवाईकांनी चिडून त्या कर्मचाऱ्यांला बेदम मारहाण केली. म्हणजे कोरोनासारख्या महाभयानक रोगाचे विषाणू गळा दाबण्यासाठी दारात उभे असतानाही या राजकारणी लोकांना फोटो व आपली जाहिरात महत्त्वाची वाटते. त्यांचा आदेश न पाळल्यामुळे त्यांना अपमान झाल्यासारखे वाटते. त्यांना आपली घमेंड सोडावी वाटत नाही, केवळ राजकारण, गुंडगिरी व मी पणाच्या प्रवृत्तीमुळे हे लोक चांगल्या कामाला हातभार लावणे ऐवजी, कामात अडथळे निर्माण करतात. स्वतःचे व समाजाचे जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात. यांचा बंदोबस्त करणे अतिशय महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दमदार घोषणा केली आहे की,' पोलिस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व प्रशासकीय यंत्रणा यांच्यावर लोकांच्या कडून हल्ले व दमदाटी करण्याचा प्रयत्न केला तर, त्यांची गय केली जाणार नाही. तसेच देशातील व राज्यातील शंभर टक्के जनतेने सहकार्य केले, तरच आपण कोरोनाच्या विरोधातील लढाई जिंकू , असा आशावाद मुख्यमंत्री व पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे. या मोकाट फिरणाऱ्या व शासकीय यंत्रणेला दमदाटी करणाऱ्या हल्लेखोर प्रवृत्तीच्या लोकांचा कठोर बंदोबस्त झाला पाहिजे. त्यांच्यामुळेच समाजावर भयानक संकट आल्याशिवाय राहणार नाही. यासाठी अशा लोकांनी स्वतः शहाणे होऊन दक्ष राहावे व सरकारच्या आदेशाचे व सूचनांचे पालन करावे, हीच मोकाट फिरणाऱ्या मंडळींच्या कडून अपेक्षा आहेत.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured