Type Here to Get Search Results !

शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ त्वरीत मिळणे आवश्यक : पालकमंत्री जयंत पाटील


शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ त्वरीत मिळणे आवश्यक : पालकमंत्री जयंत पाटील
माणदेश एक्स्प्रेस न्युज
सांगली : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे  लाभ मिळण्यात विलंब होत असल्याचे आढळून येत आहे. याची गंभीर दखल घेऊन पालकमंत्री जयंत पाटील यांनी शेतकऱ्याचा अपघात झाल्यास त्याच्या वारसांना तातडीची मदत व्हावी यासाठी कृषि विभागाने शेतकऱ्याच्या अपघातानंतर कुटुंबियांकडून त्वरीत कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी. तसेच विमा कंपन्यांकडून सदरचे क्लेम संबंधितांना मिळवून देईपर्यंत डेडीकेटेड पाठपुरावा करावा, असे निर्देश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले. 
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी कृषि व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी, महावितरणचे प्रभारी अधिक्षक अभियंता पराग बापट, कृषि उपसंचालक सुरेश मगदूम आदि उपस्थित होते.
कोणत्याही परिस्थितीत कृषि पंपांच्या प्रलंबित विद्युत जोडण्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा…
कृषि पंपांच्या विद्युत जोडणीसाठी अनामत रक्कम भरूनही महावितरणकडे सुमारे १० हजार विद्युत जोडण्या प्रलंबित आहेत. याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. सद्या ज्या कॉन्ट्रॅक्टरकडे सदर विद्युत जोडणीचे काम आहे त्याचे काम समाधानकारक नाही त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे जिल्ह्यात अतिरीक्त मनुष्यबळ देऊन पावसाळ्यापूर्वी प्रलंबित असणाऱ्या संपूर्ण विद्युत जोडण्या पूर्ण कराव्यात. जिल्ह्यातला बराचसा भाग दुष्काळी असल्याने त्यांना पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कृषि पंपांच्या विद्युत जोडणीचे काम पूर्ण करावे, असे निर्देश महावितरणच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.
पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई वंचित शेतकऱ्यांना त्वरीत द्या…
सांगली जिल्ह्यात सन 2019 मध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या कृषि क्षेत्रासाठी शासनाकडून नुकसान भरपाईची रक्कम प्राप्त झालेली आहे. तथापी जिल्ह्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांपर्यंत सदरची रक्कम पोहोचली नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. याबाबत पालकमंत्री जयंत पाटील यांनी आढावा घेतला. यावेळी बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया, ॲक्सीस बँक व फेडरल बँक यांच्याकडील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या न आल्याने रक्कम शेतकऱ्यांच्या खाती वर्ग होऊ शकली नाही, असे यावेळी सांगण्यात आले. यावर संबंधितांकडून त्वरीत याद्या प्राप्त करून घेऊन रक्कम तात्काळ शेतकऱ्यांची खाती वर्ग करा, असे निर्देश पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हा उपनिबंधक यांना दिले. या बैठकीत पालकमंत्री जयंत पाटील यांनी हवामान आधारीत फळपीक विमा योजना, मागेल त्याला शेततळे, द्राक्ष व डाळींब पिकासाठी अंश तपासणी प्रयोगशाळा आदि सर्व विषयांवर सविस्तर चर्चा केली. 


देशातील, राज्यातील व आपल्या परिसरातील बातम्यासाठी Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies