Type Here to Get Search Results !

संपादकीय :  मोदीजी काम की बात कब....?


संपादकीय :  मोदीजी काम की बात कब....?पंतप्रधानाच्या पदावरून पाठीमागील सहा वर्षापासून नरेंद्र मोदीजी फक्त ' मन की बात ' जनतेसमोर व्यक्त करून जनतेला विकासाच्या नावाखाली झुलवत ठेवत आहेत. मात्र त्यांची ही ' मन की बात ' आज पर्यंत कधी ही 'काम की बात' झालेली नाही. त्यामुळे सहा वर्षापासून आनंत समस्यांनी त्रस्त झालेली भारतातील जनता मोदीजींची ' मन की बात ' मनापासून ऐकण्या ऐवजी आता 'काम की बात' ऐकण्यासाठी आतुर झालेली आहे. कोरोनाच्या काळात देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था रसातळाला गेलेली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 ऑगस्ट रोजी 'मन की बात' कार्यक्रमामध्ये जनतेला आत्मनिर्भरतेच्या व विकासाच्या बढाया मारण्यात मागे-पुढे पाहत नाहीत.


मात्र पाठीमागील सहा वर्षापासून मोदीजी नी जनतेच्या व देशाच्या विकासाची दिलेली सर्व आश्वासने फोल ठरलेली आहेत.त्यामुळे आता जनता मोदीजीं ची मन की बात मनापासून ऐकत नाहीत. आता सर्वसामान्य जनतेच्या सहनशीलतेच्या मर्यादा संपलेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता जाहीरपणे पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांना आवाहन करीत आहे की,'आता मन की बात बंद करो आणि काम की बात करो....!' कोरोना सारख्या जागतिक महामारी ने संपूर्ण भारत देश ग्रासलेला असताना या रोगापासून जनतेचे संरक्षण व्हावे, तसेच कोरोनाच्या धरतीवर घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे देशात निर्माण झालेल्या मूलभूत समस्यांची सोडवणूक करण्याकडे मोदीजींनी लक्ष देणे अपेक्षित असताना ही, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून कोरोणाच्य पार्श्वभूमीवर कुठे थाळी वाजवा, टाळी वाजवा व दिवे लावा या प्रकारची अध्यात्मिक नाटके करून स्वतःला अध्यात्मिक क्षेत्राचा विद्वान असल्याचे भारतीयांना दाखवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे.


 
मात्र त्यानंतरही देशात कोरोनाचा रोग नियंत्रित होण्याऐवजी ही संख्या शेकडयावरून हजारावर व हजारावरुन आज घडीला कितीतरी लाखावर गेलेली आहे. मग मोदी यांनी घोषित केलेल्या थाळीनाद, टाळीनाद किंवा दिवा लावणे, इत्यादी सारखे प्रकार करून त्यांनी कोरोणावर का मात केली नाही? हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. मन की बात या कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदी हे नेहमी “वाळवाचा पाऊस” पडल्यासारखी मोठमोठी आश्वासने देत आहेत.


जनतेला सुद्धा मोदीच्या फक्त बोल बच्चनगिरीची कल्पना आलेली आहे. त्यामुळे जनता त्यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमाच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न करू लागली, तर गल्लीबोळात लपून बसलेले नरेंद्र मोदी समर्थक या विरोधी आवाज करणाऱ्यांना राष्ट्रद्रोही ठरवतात व त्यांच्यावरती आरोप लावून त्यांना जेलची यात्रा करायला भाग पाडतात. मोदींनी व त्यांच्या समर्थकांनी पाठीमागील सहा वर्षाच्या काळात देशाच्या सर्वोच्च संस्थांच्या वर आपल्या विचाराला व कार्याला अनुकूल असणाऱ्या व्यक्तींची नियुक्ती करून संपूर्ण देशाची सूत्रे हुकूमशाही पद्धतीने आपल्या हातात घेऊन सनातनी व धार्मिक प्रवृत्तीचा प्रचार-प्रसार करण्यात मग्न आहेत. त्यांना देशातील सर्वसामान्य गरीब जनता, सुशिक्षित बेरोजगार युवक, नोकरदार वर्ग, शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्या मूलभूत समस्याशी काडीमात्र ही देणे-घेणे नाही, हे दाखवून दिलेलं आहे.


त्यामुळे या सर्वांच्या मनामध्ये नरेंद्र मोदीजींच्या 'मन की बात' या कार्यक्रमाच्या विरोधात आक्रोश खदखदत आहे. देशातील सर्व छोटे-मोठे उद्योग धंदे बंद होऊन कामगार देशोधडीला लागलेले आहेत. शिक्षण क्षेत्राची चित्तर कथा भयानक झालेली आहे. कोरोना महामारी व तिला नियंत्रित करण्यासाठी मोदीजींच्या सरकारने सुरू केलेले लॉकडाऊनमुळे संपूर्ण मानवी जीवन विस्कळीत झालेले आहे. जनतेच्या समोर जगण्यासाठी अन्न, पाणी, वस्त्र व निवारा या समस्या उभ्या टाकलेल्या आहेत. प्रशासकीय व्यवस्था पूर्णतः कोलमडून गेलेली आहे. संरक्षण यंत्रणा, महसूल विभाग, आरोग्य विभाग या सर्वांचे लक्ष कोरोना पासून जनतेचे रक्षण करण्यासाठी केंद्रित झालेलं आहे. असे असताना ही नरेंद्र मोदी जी आणि त्यांचे सर्व बगलबच्चे आपल्या सनातनी विचारांचा, कार्याचा व धार्मिकतेचा प्रचार प्रसार करण्यात मग्न आहेत.


एवढेच नाही, तर त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या सर्व तत्त्वांना बगल देऊन, धर्मनिरपेक्षतेला मूठमाती देऊन फक्त आणि फक्त हिंदू धर्माचा व हिंदूधर्मीय देवी-देवतांचा प्रचार-प्रसार करण्यात स्वतःला धन्यता मानत आहेत. मोदीजींचा हा सर्व सनातनी, धार्मिक व अध्यात्मिक व्यवहार पाठीमागील सहा वर्षापासून डोळे उघडून जनता बघत आहे. सर्व भारतीय जनतेच्या आता ही गोष्ट लक्षात आलेली आहे की, मोदी हे फक्त फेकू आहेत. त्यांच्याकडून फक्त बोलाचीच कडी व बोलाचाच भात होत आहे. प्रत्यक्षात जनहिताच्या कामाकडे त्यांनी अजिबात लक्ष दिलेलं नाही. ही गोष्ट जनतेच्या मनात खदखदत आहे. कदाचित भविष्यामध्ये जनता मोदींना त्यांच्या मन की बात का प्रसाद योग्य पद्धतीने दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मोदींनी आता 'मन की बात' बंद करावी व 'काम की बात' सुरू करावी अन्यथा जनता त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies