Type Here to Get Search Results !

“शेणात तोंड बरबटले असेल तर, कायदा काम करीलच” : शिवसेना
 “शेणात तोंड बरबटले असेल तर, कायदा काम करीलच” : शिवसेना मुंबई : 'ज्यांना महाराष्ट्रातील कथित आणीबाणीचा त्रास होतोय त्यांना देशातील एकांगी कारभार व हुकूमशाही प्रवृत्तीची भीती वाटत नाही. अठरा दिवसांपासून पंजाब-हरयाणाचा शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करतोय. त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारणे, अश्रुधूर सोडणे यास आणीबाणीचा कोणता प्रकार मानायचा? महाराष्ट्रात आणीबाणी आहे की नाही हे जनता ठरवेल, पण दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या दडपशाहीचे काय? त्या आणीबाणीवर बोला' असा थेट सवाल सेनेनं केला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे.
 'विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बऱ्याच दिवसांनी सूर लागला असे वाटत होते, पण पहिली तान घेताच त्यांना टीकेची उबळ आली आणि सूर बिघडून गेले. कोणत्या वेळी कोणता राग गावा याचे शास्त्र आहे. पण शास्त्रीय गायन सुरू असतानाच ‘डीजे’ लावावा तसे घडले' असं म्हणत शिवसेनेनं भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.'महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी आहे. तसेच वातावरण तयार झाल्याचा सूर फडणवीस यांनी आळवला आहे. कुठल्या तरी प्रकरणात अडकवले जात आहे, अशी ‘थाप’ मारून त्यांनी सूर पकडण्याचा प्रयत्न केला. तो फसला. महाराष्ट्राइतके मोकळे वातावरण जगात कुठेच नसेल. स्वतः फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशीष शेलार यांच्यासारखे प्रमुख पुढारी रोज सरकारच्या विरोधात ‘डीजे’ लावल्याप्रमाणे ठणाणा करीत आहेत. रस्त्यांवर आंदोलन करीत आहेत. वृत्तपत्रांना मुलाखती देऊन खोटे आरोप करीत आहेत. सरकारच्या बदनामीच्या मोहिमा चालवीत आहेत. हे सर्व सुरळीत चालू असताना सरकारी यंत्रणा विरोधकांची मुस्कटदाबी करीत आहे, असे हे लोक कोणत्या तोंडाने सांगतात? असा सवाल विचारत सेनेनं भाजपला टोला लगावला आहे.'विधिमंडळांचे अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी फेकूचंद पडळकरांसारखे नेते विधानसभेच्या दारात पारंपरिक ढोल वाजवून सरकारविरोधात नाचगाणे, घोषणाबाजी करीत होते. त्या ढोलवादनाचे थेट प्रसारण सर्व वृत्तवाहिन्या दाखवीत होत्या. हुकूमशाही किंवा आणीबाणीसारखी परिस्थिती असती तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरुंगात टाकले असते, पण फेकूचंदना लोकशाही मार्गाने ढोल वाजवून निषेध करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे.  धनगर आरक्षण, मराठा आरक्षण हे संवेदनशील विषय आहेत. कुणावरही अन्याय न होता आरक्षण मिळावे, ही शासनाची भूमिका आहेच. कायद्याची चौकट मोडू नये. त्या चौकटीत सगळ्यांना बसवायचे आहे. फेकूचंदांनी हे समजून घेतले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाबाबत निर्णय दिले. त्यामुळे आणीबाणीची स्थिती निर्माण झाली असेल तर विधिमंडळाबाहेर सरकारविरोधी नृत्यालाप करून काय होणार? असा सणसणीत टोला सेनेनं पडळकरांना लगावला.'फडणवीस व त्यांच्या सहकाऱ्यांना आणीबाणीविषयी फारच प्रेम आहे. कुठे काही झाले की ते आणीबाणीच्या नावाने अश्रू ढाळू लागतात. फडणवीस यांना महाराष्ट्रात असे कुठे घडत असताना दिसत असेल तर त्यांनी तसे रोखठोकपणे बोलायला हवे. ठाकरे सरकारने भ्रष्टाचार व अनियमितता याबाबत जुन्या प्रकरणांच्या चौकशीची घोषणा केली. त्यावर विरोधकांनी इतके हडबडून जायचे कारण नाही. चौकशीला घाबरायचे कारण नाही व हे सर्व सूडाचे राजकारण आहे, असे बोंबलायची गरज नाही.  शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक व त्यांच्या कुटुंबीयांच्या बाबतीत ‘ईडी’सारख्या केंद्रीय संस्था जो छळवाद करीत आहेत त्यावर भाजप पुढाऱ्यांच्या प्रतिक्रिया एकदम हरिश्चंद्री थाटाच्या आहेत, काही चुकीचे केले नसेल तर घाबरायचे कारण काय? असे सल्ले दिले जात आहेत. तेच सल्ले सरकार विरोधकांनाही लागू पडतात. जलयुक्त शिवार योजना, बीएचआर सोसायटी घोटाळा, बँक, आधीच्या सरकारची रस्ते कंत्राटे याबाबत व्यवहार चोख असतील तर इतका घाम फुटायचे कारण काय? शेणात तोंड बरबटले असेल तर कायदा काम करीलच व कायद्याने काम केले तर आणीबाणी आली असे बोंबलायचे. हा काय प्रकार आहे? असा सवालच सेनेनं भाजपला केला आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies