Type Here to Get Search Results !

ऊसाला तुरे आल्याने शेतकरी संकटात : माण तालुक्यात साखर कारखान्या अभावी शिल्लक उसाची चिंताम्हसवड/अहमद मुल्ला : माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी परिसरातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. ऊसाचे पीक तोडणी योग्य होऊन बराच काळ लोटला तरी देखील कारखान्याकडून ऊस तोडणी बाबत कोणताही कार्यवाही झाली नसल्याने शेतकऱ्यांचा ऊस दिवसेंदिवस पुढे जात आहे, अनेक ठिकठिकाणी ऊसाने तुरे टाकले आहेत. यामुळे वरकुटे-मलवडी परिसरातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. 


सध्या शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्नांना उधाण आले आहे. तुरे टाकल्याने ऊसाच्या रसात घट होत असल्याचे ही बोलले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला दर मिळणार का? यावर प्रश्न चिन्ह उभे राहत आहे. दर मिळाला, तर वजनात घट होणार याचे काय? अशा अनेक प्रश्नांनी शेतकऱ्यांच्या मनी काहुर माजले आहे. त्यामुळे शेतकरी संघटना कोणती भूमिका घेणार तसेच प्रशासन कारखाना मालकावर कारवाई करणार का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. परंतु या सर्व प्रश्नात मात्र येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर भरडला जाणार यात तीळमात्र शंका नाही. शेतकऱ्यांवर एकीकडे अवकाळीचे संकट तर दुसरीकडे शेतात असलेल्या ऊसाचे संकट असा शेतकरी दुहेरी संकटात अडकला आहे.


महाबळेश्वरवाडीचा तलाव, पडळकर खडक तलाव, तुडकाकडा तलाव या तीनही तलावाच्या काठावरील बहुतांश शेतकऱ्यांनी व आजूबाजूच्या तलाव क्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केलेली आहे. उसाला मोठ्या प्रमाणावर तुरे लागले आहेत. माण तालुक्यात साखर कारखाना नसल्याने शेतकऱ्यांसमोर ऊस तोडणीचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. वरकुटे-मलवडीसह, बनगरवाडी, महाबळेश्वरवाडी, खरातवाडी व कुरणेवाडी परिसरातील सर्वच शेतकऱ्यांच्या ऊसाला मोठ्या प्रमाणावर तुरा निघाला आहे, त्यामुळे ऊसाच्या वजनात घट होणार असून उत्पन्न कमी मिळणार आहे.


सद्य परिस्थितीत माण तालुक्यात एकही साखर कारखाना नाही. आजुबाजुच्या खटाव, फलटण, माळशिरस, आटपाडी तालुक्यात कारखाने आहेत. सातारा जिल्ह्यात व शेजारच्या तालुक्यात कारखान्यांची संख्या वाढली खरी पण कारखानदार तुपाशी अन शेतकरी उपाशीच राहत आहे. वशिलेबाजीतून गाव पुढाऱ्यांची मनधरणी, मुकादम, वाहतूकदार, तोडणी कामगार अशा सर्वांचेच हात ओले करावे लागत असल्याने एकरी पाच ते सहा हजार रुपये खर्चून ही ऊस तोड टोळी वेळेत मिळण्याची शाश्वती नाही. शेतासाठी केवळ आठ तासच वीज उपलब्ध आहे. तेवढ्या वेळेत कांदा व इतर रब्बी पिकांना पाणी दिले जात असल्याने ऊसाला पाणी ही मिळेना परिणामी वजनात अजूनही घट होत आहे. महाबळेश्वरवाडी तलावात टेंभू योजनेचे पाणी आणण्यासाठी मी स्वतः सातत्याने पाठपुरावा केला आहे. महाबळेश्वरवाडी तलावात टेंभू योजनेचे पाणी आल्याने या परिसरात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. महाबळेश्वरवाडीसह, वरकुटे-मलवडी, बनगरवाडी, खरातवाडी, कुरणेवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. टेंभुचे योजनेचे पाणी आल्याने अनेक शेतकरी ऊस पिकाकडे वळले आहेत. या पाण्यामुळे ऊसाचे क्षेत्र कमालाचे वाढले. भविष्यात ही पाण्याची कमतरता जाणवणार नाही. वर्षातून दोनवेळा महाबळेश्वरवाडीचा पाझर तलाव टेंभूच्या पाण्याने भरून देण्यात येणार आहे. 

अनिलभाऊ देसाई

 उपाध्यक्ष , सातारा जिल्हा मध्यवर्ती सह.बँक


मजुरांची वानवा, वीज उपलब्ध होत नसल्याने व अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मी ऊस पिकाकडे वळलो, मात्र ऊसाला वेळेवर तोडणी येत नसल्याने त्याला तुरा येवून वजनात घट होते. त्यामुळे हे पीक परवडणारे नाही. 

 बबन जाधव, शेतकरी

वरकुटे-मलवडी, ता.माण

 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies