Type Here to Get Search Results !

शहरात फोफावलेल्या नशेखोरीविरोधात टास्क फोर्सची स्थापना....!


औरंगाबादः गेल्या काही दिवसांपासून शहरात वाढलेली गुंडगिरी आणि गुन्हेविषयक घटनांमागे नशेखोरांचे प्रमाण लक्षणीय असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे गुन्हेगारी कमी करण्यासाठी आधी नशेबाजांवर लगाम घालणे आवश्यक झाले आहे. शहरात गल्लोगल्ली नशेच्या, झोपेच्या गोळ्या कोणत्याही डॉक्टरांच्या चिठ्ठीविना मिळतात, हा प्रकार थांबवणे आता अत्यावश्यक झाले आहे. हा प्रकार रोखण्यासाठी आता शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. यात अन्न व औषधी प्रशासन, पोलीस प्रशासन, प्रादेशिक परिवहन अदिकारी आणि औषधी विक्रेत्यांचा एक टास्क फोर्स  स्थापन करण्यात आला आहे. आमदार अंबादास दानवे यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद काळेश्वरकर, सहाय्यक आयुक्त शाम साळे यांच्यासह पोलीस आणि आरटीओ कार्यालयाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.



औरंगाबादमध्ये विविध गल्ल्यांमध्ये औषध विक्रेत्यांकडून नशेखोरीसाठीच्या गोळ्या मिळत असल्याचे वृत्त अनेकदा माध्यमांमधून प्रसारीत झाले. तसेच पोलिसांच्या छाप्यातही अनेकदा नशेखोरीच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गल्लीबोळातील औषध विक्रेत्यांकडून बटण, ऑरेंज, किटकॅटच्या नावाखाली झोपेच्या गोळ्यांचा डोस देण्याचा उद्योग सुरु असल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाने डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय झोपेच्या गोळ्या देणाऱ्या औषधी दुकानांची झडती घेतली. यात त्रुटी आढळून आलेल्या दोन औषधी विक्रेत्यांना नोटीसाही बजावल्या. या प्रकारांची आमदार अंबादास दानवे यांनी गांभीर्याने दखल घेत नुकतीच अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली आणि नशेखोरीवर आळा घालण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली.



टास्क फोर्स कसे काम करणार?


नशेसाठी परराज्यातून येणाऱ्या झोपेच्या गोळ्यांवर औषध प्रशासन आमि आरटीओ कार्यालयाचे पथक लक्ष ठेवणार आहे. औषधी दुकानांव्यतिरिक्त पान टपऱ्यांसह इतर ठिकाणी जिथे नशेखोरीच्या गोळ्यांची विक्री होते, तेथेही पोलीस लक्ष ठेवून कारवाई करतील. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय झोपेच्या गोळ्या विक्रेत्यांनी देऊ नये तसेच नशेसाठी वापर होणाऱ्या गोळ्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मनोरुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयात, मेडिकल स्टोअरशिवाय इतर कुठेही मिळमार नाहीत, यासाठी औरंगाबाद जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट काम करणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies