मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली असल्याचे बोलले जात आहे. या फुटीमुळे राज्यात शिंदे आणि ठाकरे असे दोन गट शिवसेनेमध्ये निर्माण झाले. याच पार्श्वभूमिवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना या शिवसेनेच्या मुखपत्रासाठी एक मुलाखत दिली असून या मुलाखतीत त्यांनी अनेक खुलासे केले आहेत.
'बाळासाहेब ठाकरेंनंतर शिवसेना खतम करायची अशी त्यांची योजना होती. त्यांचं तेच स्वप्न होतं. पण बाळासाहेबांनंतर तुम्ही शिवसेना उभी केलीत, असा प्रश्न त्यांना संजय राऊत यांना विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले, 'त्यांच्या पोटात तेच दुखतंय. त्यांना शिवसेना आणि ठाकरे वेगळे करायचे आहेत. जसे गांधी आणि काँग्रेस वेगळी करायची होती, होय खरंच आहे. मला केवळ टीकात्मक बोलायचे म्हणून मी बोलत नाही.
मात्र, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषबाबू तसं बाळासाहेब. हे स्वतःचेच म्हणून आता लोकांसमोर आणायचा प्रयत्न करताहेत. आपल्याकडून काही आदर्श निर्माण झाला नाही त्यामुळे जसा पक्ष फोडत आहेत तसेच दुसऱ्यांचे आदर्श देखील फोडायचे असा त्यांचा डाव असल्याची टीका ठाकरे यांनी शिंदे आणि भाजप यांच्यावर केली.
दरम्यान, या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांसह विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.