माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब मोटे, मधुकर पिंजारी, श्रीमंत बुधावले, गणेश कबीर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला निंबवडे गावच्या सत्तापरिवर्तनाचा पराक्रम प्रशंसनीय असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ट नेते रावसाहेबकाका पाटील यांनी काढले.
निंबवडे ग्रामपंचायत निवडणूकीत सरपंच पदासह अन्य ९ जागा जिंकून बाळासाहेब मोटे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने मोठा विजय संपादन करीत सत्ता परिवर्तन केले. नुतन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी रावसाहेबकाका पाटील यांनी केलेल्या मौलीक सहकाऱ्याबद्दल त्यांचा निंबवडेकरांचे वतीने फेटा बांधून सत्कार करणेत आला . तर रावसाहेब काका पाटील यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा फेटा बांधून सत्कार केला . त्यावेळी सर्वांचे अभिनंदन करताना रावसाहेबकाका पाटील हे बोलत होते.
गावच्या सर्वांगीण, चौफेर विकासासाठी यापुढच्या काळात सतत कार्यरत रहात जनतारुपी जनार्धनांचे प्रेम आत्मसात करा . केलेल्या कामाच्या जोरावर अनेक वर्षे सत्तेत राहण्याचा भीम पराक्रमही तुम्ही भविष्यात नोंदवावा . सादिक खाटीक यांनी सुचविलेल्या राष्ट्रगीताचा उपक्रम सुरू करण्यासाठी ग्रा.पं. मासीक मिटींग, ग्रामसभेत उहापोह करीत याची सुरुवात येत्या २६ जानेवारीपासून करावी. अशा अपेक्षाही रावसाहेबकाका पाटील यांनी व्यक्त केल्या.
हिवरे बाजार, पाटोदा, राणेगणसिध्दी, काठोडा, मौजे शेरगाव, गोधनी, विरसाई, ठिकेकरवाडी, निढळ या महाराष्ट्रातील आदर्श गावांप्रमाणे भविष्यात आटपाडी तालुक्यातील निंबवडे गाव, राज्यात सर्वोत्तम आदर्श गांव ठरावे. यासाठी नवीन पदाधिकार्यां नी प्रयत्न करावेत. त्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी राज्यातल्या या आदर्श गावांना भेट देत तेथील परिवर्तनाचा अभ्यास करावा व तो आपल्याकडे राबविण्याचा ध्यास घ्यावा . अशी अपेक्षा व्यक्त करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक यांनी, निंबवडे येथे प्रतिदिनी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयावर लाऊडस्पीकर वरून राष्ट्रगीत सादरीकरणाचा उपक्रम सुरू करून, असा उपक्रम राबविणारे आटपाडी तालुक्यातील निंबवडे पहिले गाव ठरण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. राष्ट्रगीताचा हा भिलवडी पॅटर्न निंबवडेचीही नवी ओळख बनावा, असा आशावाद नवनिर्वाचितांना शुभेच्छा देताना सादिक खाटीक यांनी व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ट नेते विष्णूपंत चव्हाण पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आटपाडी तालुका अध्यक्ष सुरज पाटील, निंबवडेचे लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब मोटे, ग्रा.पं. सदस्य मधुकर (शेठ) पिंजारी, विजय पिंजारी सर, युवा नेते कुमार माने, महेश मेटकरी, गणेश कबीर सर, श्रीमंत बुधावले, राष्ट्रवादी सोशल मिडीयाचे तालुका अध्यक्ष किशोर गायकवाड, अतुल जावीर , नितीन डांगे, गणेश ऐवळे सर, सुहास खंदारे इत्यादी अनेक जण उपस्थित होते.