Type Here to Get Search Results !

महिलांना मोफत प्रवास नसला तरी चालेल, पण पदवीपर्यंतचे शिक्षण द्या' : ॲड. वैशाली डोळस

 


माणदेश एक्सप्रेस न्यूज  

कुंडल : देशातील महिलांना एसटीमधून मोफत प्रवास नसला तरी चालेल, पण पूर्व प्राथमिक ते पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत असायला हवे, असे प्रतिपादन ॲड. वैशाली डोळस यांनी केले.


त्या कुंडल (ता. पलूस) येथे क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘क्रांतिअग्रणी’ व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना ‘भारतातील स्त्रिया’ या विषयावर बोलत होत्या. उद्योजक चेतन पारेख अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार अरुण लाड, ॲड. प्रकाश लाड, जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड, उद्योजक उदय लाड, दिलीप लाड, ‘क्रांती’चे अध्यक्ष शरद लाड, व्ही. वाय. पाटील, सरपंच जयराज होवाळ प्रमुख उपस्थित होते.


प्रारंभी क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड व क्रांतिवीरांगना विजयाताई लाड यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ॲड. वैशाली डोळस म्हणाल्या, शरीरातील बदल सोडला तर महिला पुरुषांइतक्याच सक्षम आहेत. स्त्री माणूस असून स्वतंत्र व्यक्ती व देशाची नागरिक आहे. त्यांना पुरुषांइतकाच हक्क आहे. महिलांना स्वातंत्र्य नसते हे सांगणारी मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न सध्याची व्यवस्था करत आहे.


वैवाहिक जीवन जोडत असतानाही सध्या पदव्यांचे मॅचिंग केले जात आहे. क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांचा विवाह आजच्या तरुण पिढीला प्रेरणा देणारा आहे. आमदार अरुण लाड यांनी क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापूंचा जो सचित्र इतिहास मांडला आहे तो पुढील पिढीला प्रेरणा देणारा आहे. महिलांना माणूस म्हणून समजून घेतले पाहिजे. जगण्यातील वास्तविकता व दूरचित्रवाणीवरील आभासीपण आपल्याला समजले पाहिजे. आभासी संस्कृतीमुळे जीवन जगणे हरवत चालले आहे.


पुरुषांच्या आशा, आकांक्षा माणूस म्हणून योग्य आहेत हे समाजाने मान्य केले, मात्र महिलांच्या जीवनातील आशा आकांक्षा ब्राह्मणी सत्तेने कधीच समजून घेतल्या नाहीत. उच्चभ्रू घराण्यातील महिलांवर जास्त बंधने घातली जात आहेत.


यावेळी क्रांती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा धनश्री लाड, कुंडलिक एडके, प्रा. डॉ. प्रताप लाड, अरुण पवार, संदीप पवार, जगन्नाथ आवटे, दिनकर लाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies