Type Here to Get Search Results !

वसंतदादा घराण्यावर सातत्याने राजकीय हल्ले होत असतानाही त्यांचे वारस बेसावध, बेफिकीर का?



हाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले  पॉवरफुल नेते वसंतदादा पाटील हे कॉंग्रेसचे कद्दर नेता म्हणून ओळखले जातात. जवळपास तीन दशके महाराष्ट्रातील लोकसभा, विधानसभा व इतर महत्त्वाच्या निवडणुकीसाठी सांगलीतून उमेदवारी निश्चित केली जात होती. परंतू दादांच्या पश्चात सर्व घराण्याला राजकारणात ओहोटी लागली आहे. सध्या तर तिकीट मिळवणे सुध्दा दुरापास्त झाले आहे.कितीही पडझड का झाली? कोणी केली? यामध्ये बाहेरच्या घटकांइतकेच, स्वकीय व खुद्द घराण्यातील वंशजही कारणीभूत आहेत.



वसंतदादा हयात असतानाच जनता दलाचे पै.संभाजी पवार यांनी दादांना आव्हान देऊन सांगलीची विधानसभा हस्तगत केली होती, त्यानंतर सलग तीन वेळा आमदारकी त्यांनी मिळवली होती. शेजारच्या मिरज मतदारसंघातही प्रा.शरद पाटील यांनी कॉंग्रेसच्या उमेदवाराचा दारुण पराभव केला होता. हे सर्व दादांच्या होम ग्राऊंडवर घडत होते. विशेष म्हणजे पै.संभाजी पवार व प्रा.शरद पाटील हे जनता पक्षाचे नेते राजारामबापू पाटील यांचे कार्यकर्ते होते. तेव्हापासून सुरू झालेला हा राजकीय संघर्ष दूसऱ्या, तिसऱ्या पिढीत सुरूच आहे. याकाळात वसंतदादांचे पुतणे जेष्ठ नेते विष्णुआण्णा हे लोकामधून कधीच निवडून येऊ शकले नाहीत. पुढे त्यांचे पुत्र मदनभाऊंना पण याच हितशत्रूंचा खूप त्रास झाला. परंतु ते खमके  व आक्रमक नेते असल्याने मित्रांच्या कटकारस्थानाला जशास तसे प्रत्युत्तर देऊन ते पुरून उरले. त्यांनी सावधपणे राजकारण केल्याने दादा घराणे पुन्हा राज्याच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता निर्माण झाली होती, तोपर्यंत त्यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर ही दादा घराणे कायमचे संपुष्टात यावे म्हणून मिरज दंगल घडविण्यात आल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. त्यास काही प्रमाणात यश देखील आले होते. कारण, सांगली, मिरज दोन्ही विधानसभा व सांगली लोकसभा कॉंग्रेसच्या हातून काढून घेण्यात हितशत्रूंना यश आले. जसा वसंतदादा, विष्णुअण्णा,मदनभाऊ यांना दुष्टचक्रात अडकवले तसेच आर.आर. पाटील व पतंगराव कदम यांना पण सतत संघर्ष करावा लागला होता. त्यांना सतत मतदारसंघात अडकवून ठेवण्यात हितशत्रूंच्या खेळीला यश आले. यामुळे राज्यात त्यांना क्षमता असूनही मोठी झेप घेता आली नाही. यामध्ये सर्वात सुदैवी ठरले ते प्रकाशबापू पाटील. कारण त्यांनी कधी इतरांना त्रास दिला नाही म्हणून त्यांची खासदारकी तहहयात राहिली.



त्यानंतर अलिकडचा ताजा प्रसंग म्हणजे मदनभाऊ हयात असतानाच,सांगली महापालिकेत त्यांच्या गटात खिंडार पाडून सांगली मनपातील सत्ता उलथवली. तर २०१४ ला कॉंग्रेसचे प्रतिक पाटील व भाजपचे संजय पाटील यांच्यात निकराचा सामना होऊन, परंतु फंदफितुरीमुळे कॉंग्रेसचा बालेकिल्ला ढासळला गेला. पुढे तर २०१९ च्या निवडणुकीत कॉंग्रेसचे  निवडणूक चिन्ह गायब झाले आणि आता २०२४ च्या निवडणूकीत तर पक्ष,चिन्ह, जिल्हा कार्यकारिणी गुंडाळून ठेवण्याची नामुष्की कॉंग्रेस व वसंतदादा घराण्यावर आली आहे.



आघाडीतील मित्र पक्षाने  एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. एक तर उध्दव ठाकरे यांचा बळीचा बकरा बनवला आणि दुसरीकडे दादा घराण्यात  उमेदवारी जाणार नाही अशी तजवीज करून ठेवली. कारण सांगली जिल्ह्यात कॉंग्रेसची मोठी ताकद आहे, हे शेंबडे पोरगं पण सांगेल. तरीसुद्धा हटवादी भुमिका घेऊन ठाकरेंनी महाआघाडीची एक जागा हकनाक धोक्यात घातली आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने जागा वाटप निर्णय प्रक्रिया ताळमेळ न राखता पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. या दोघांच्या भांडणात हितशत्रूंनी आपले कटकारस्थान व षडयंत्र रचूनच पुढील बाजी मारली आहे.



एवढे डावपेच, राजकारण,फंदफितुरी होऊनही दादा घराण्यातील वारस इतके बेफिकीर, बेसावध व विस्कळीत कसे काय? इतक्या वर्षांपासून हे सर्व घडत येत असून, ते यावर उपाययोजना,डॅमेज कंट्रोल का नाही करत. अजूनही सांगली, मिरज सोडून ते कधी जिल्हाभर का फिरत नाहीत? त्यांनी कधी मतदारसंघात आपली गटबांधणी का केली नाही?आ जसुध्दा शिराळा, वाळवा, आटपाडी, जत येथे दादा घराण्याला मानणारे हक्काचे कार्यकर्ते शोधूनही सापडणार नाहीत. त्यामुळे दादा गटाला मानणारे अनेक जुने जाणते नेते इतर पक्षांत स्थिरस्थावर झाले आहेत. अनेक विधानसभा मतदारसंघात पक्षाचे चिन्ह, कार्यकारिणी विस्मृतीत गेले आहे, तालुक्यांत कॉंग्रेस भवन इतर पक्षांनी बळकावले आहे. दादा घराण्याविरोधी कोणी भाजप, शिवसेना, आरपीआय, वंचित, कम्युनिस्टांचे  कार्यकर्ते नसून त्यांच्या जवळचे व आघाडीतील हितशत्रू नेतेच आहेत, हे सुर्यप्रकाशाएवढे स्वच्छ दिसत असूनही त्यांनी कधी डावास प्रतिडाव  केला नाही, जशास तसे उत्तर दिले नाही. पुर्वी तो केला फक्त आणि फक्त वसंतदादांनी, त्याचाच सुड आजही उगवला जात आहे.



एकूणच सध्या राजकारणात दादा घराण्यावर अवकळा आली आहे हे मात्र नक्की. सध्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जरी विशाल पाटील यांनी बंडखोरी केली असली तरी ती त्यांच्या व घराण्याच्या अस्तित्वाची लढाई आहे. हे मात्र नक्की. याचा सामना जयश्रीताई, प्रतिक पाटील, शैलजाभाभी व विशाल पाटील यांनी करावी, तरच भावी काळात त्यांचे राजकारण सुरक्षित, सुखरूप होऊन त्यास गतवैभव प्राप्त होईल?




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies