Type Here to Get Search Results !

पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे


 


पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे



सांगली : पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब आहे. मुंबई, ठाण्याकडून या साथीचा फोकस सांगली, कोल्हापूर व साताराकडे सरकणे निश्चितच जबाबदारी वाढवणारा आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सर्वसामान्य जनतेचा सहभाग होता. तसाच कोरोना मुक्तीत प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्वाचे आहे. कोरोना दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्था यांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले.



मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यातील कोरोनाबाबतचा आढावा व्हिडीओ कॉन्फरंसिंगव्दारे घेतला. यावेळी मुख्य सचिव संजय कुमार, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस, मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुखे उपस्थित होते. 



मुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले, पुढच्यास ठेच मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे कोरोना लढ्यात ज्या चुका यापूर्वी इतर काही जिल्ह्यांकडून झाल्या असतील त्या तुम्ही होवू देवू नका. इतर देश फक्त कोव्हिड एके कोव्हिडचा मुकाबला करत आहेत. आपल्याकडे गणेशोत्सव, मोहरम पार पडला. आता नवरात्र, दसरा, दिवाळी हे सण येतील. त्यातच पाऊस सुरु आहे. त्यामुळे आपले आव्हान अधिक मोठे आहे. हा कसोटीचा काळ आहे. सुविधा कितीही उभ्या केल्या तरी शेवटी काही प्रमुख मूळ मुद्यांवर लक्ष केंद्रीत करा तर 15 दिवसांत चांगले परिणाम दिसतील. हे मुद्दे म्हणजे एकेका रूग्णामागचे जास्तीत-जास्त संपर्क शोधा. चेस द व्हायरस मोहीम अधिक गांभीर्यपूरक राबवा. कंटेन्टमेंट क्षेत्रात कडक नियम पाळा. चाचण्यांची क्षमता वाढवा. घरोघर सर्वेक्षणाला अधिक गती द्या.



आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक, वैद्यकीय सहाय्यक यांच्या सहभागाने घरोघरी भेटी देवून कुटूंबाच्या आरोग्याची चौकशी करणारी मोहीम राबविणार आहोत. ही तपासणी नसेल असे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, यात घरातील कुणाला इतरही काही आजार आहेत का. त्यांचे आरोग्य कसे आहे. त्यांना न्युमोनिया सदृश्य काही लक्षणे आहेत का. घरात बाहेरून कुणी व्यक्ती आले आहेत. मास्क व इतर शारिरीक अंतराच्या नियमांचे पालन व्यवस्थित केले जाते का. याविषयी पूर्ण माहिती विचारली जाईल. केवळ पश्चिम महाराष्ट्रातीलच नव्हे तर कोणत्याही जिल्ह्याला या कोरोना लढ्यात काही अडचण आल्यास किंवा काही कमतरता भासल्यास राज्य शासन संपूर्ण सहकार्य करणार. मात्र कुचराई करू नका, गाफील राहू नका.
कोरोना विषाणूवर लस येईल तेव्हा येईल, पण कायमस्वरूपी चेहऱ्याला मास्क लावा. शारीरिक अंतर राखणे, गर्दी टाळणे, वारंवार हात धुणे ही त्रिसुत्री अतिशय महत्वाची आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, सुविधा उभारण्यात मदत केली जाईल. निधीही कमी पडू दिला जाणार नाही. मात्र या सुविधा वापरायची वेळ येणार नाही इतक्या जबाबदारीने काम करा आणि कोरोना रोखा. अनलॉकमध्ये अनेक व्यवहार सुरू केले आहेत. मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्याच्या विनंत्या करण्यात येणार आहेत. मात्र सावधानता बाळगावीच लागणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.



सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई, सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह, कोल्हापूर महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, यांनी यावेळी कोरोनाबाबतचा सविस्तर आढावा सादर केला. मुख्य सचिव संजय कुमार, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. व्यास आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार श्री. मेहता यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies