Type Here to Get Search Results !

पाण्यासाठी खासदारकीचा राजीनामा देऊ : खासदार संजय पाटील आक्रमक ; सातारच्या पालकमंत्र्यांची अरेरावी खपवून घेणार नाही



माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : सांगलीचे हक्काचे पाणी वेळेच्या वेळी कोयना धरणातून कृष्णा नदीत सोडले गेले पाहिजे. आतापर्यंत हे पाणी नियोजनानुसार सोडण्यात येत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पाणी सोडण्याबाबत सातारचे पालकमंत्री यांची लुडबुड सुरू आहे. ही लुडबुड आम्ही खपवून घेणार नाही. पाण्यासाठी प्रसंगी राजीनामा देऊ, असा इशारा खासदार संजय पाटील यांनी आज (दि.२५) पत्रकार परिषदेत दिला. 


ते म्हणाले, जिल्ह्यात सध्या दुष्काळाची स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्यातून पाण्याची मागणी वाढलेली आहे. पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाणी देणे हे गरजेचे आहे. पाण्यापासून वीज निर्मिती करण्या ऐवजी ती इतर माध्यमातून उपलब्ध करता येईल . कालवा समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे सांगली जिल्ह्याच्या वाट्याला 32 टीएमसी पाणी आलेले आहे. त्याशिवाय वीज निर्मितीसाठी लागणारे आणखी 12 टीएमसी पाण्याची मागणी केलेली आहे . धरणातून वेळच्यावेळी पाणी सोडणे गरजेचे आहे . मात्र पाणी सोडण्याबाबत काहींच्याकडून अडकाटी केली जात आहे. त्यातून जिल्ह्याला वेटीस धरण्याचा प्रयत्न असल्याचे दिसत आहे. 


पाण्याच्या माध्यमातून राजकारण केले जात आहे . पाणी सोडणाऱ्या अधिकाऱ्यांना धमकावले जात आहे. आमच्या पक्षासोबत सत्तेत असलेले काही लोक हे करत असतील तर आम्ही ते सहन करणार नाही. राजकीय हस्तक्षेप करून जिल्ह्याच्या आत्मसन्मानाला ठेच पोचवली जात असेल तर ते चुकीचे आहे. कोयना धरण कोणाच्या मालकीचे नाही. पाण्याच्या विषयात राजकारण आणणे चुकीचे आहे . या अगोदरही दोन वेळा असा प्रकार घडलेला आहे. यापुढे असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. प्रसंगी या विषयावर मी राजीनामा देणार आहे.


ते म्हणाले, पाण्या संदर्भातील सर्व अधिकार हे जलसंपदा मंत्र्याकडे असतात. तरीसुद्धा काहीजण लुडबुड करून कोयनेतून पाणी सोडण्यात अडवणूक करीत आहेत. हे चुकीचे असून या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार करणार आहे.






إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies