Type Here to Get Search Results !

पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठं खिंडार, बड्या नेत्याचा शरद पवार गटात पक्षप्रवेश निश्चित



माणदेश एक्सप्रेस न्युज : पुणे :  पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपला मोठा फटका बसणार असून मोठा नेता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहे. 


पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड घडामोडी घडत आहेत. भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यांनी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर होण्याआधीच आपल्या उमेदवारीचा दावा केला होता. पण भाजपने माढ्याचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे मोहिते पाटलांचा गट प्रचंड नाराज झाला. 


फक्त धैर्यशील मोहिते पाटील नाराज झाले नाहीत. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर हे देखील नाराज झाले. त्यांनी तर उघडपणे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध केला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची भाषा केली. ते लवकरच आता शरद पवार गटात प्रवेश करतील, अशीदेखील चर्चा आहे.


धैर्यशील मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला राष्ट्रवादी शरद पवार गटातून उमेदवारी दिली जाईल, अशी माहिती समोर आली होती. त्यानंतर आता धैर्यशील मोहिते पाटील यांचं नाव निश्चित झाल्याचीदेखील चर्चा आहे. विशेष म्हणजे याबाबत महत्त्वाच्या हालचाली घडल्या आहेत. 


धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेतली आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ चर्चा झाली. या बैठकीनंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी वेट अँण्ड वॉच अशी प्रतिक्रिया दिली. तर शरद पवार यांनी यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशाची बातमीच देवून टाकली.



धैर्यशील मोहिते पाटील यांचा येत्या 14 एप्रिलला पक्षप्रवेश होणार आहे. त्यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून महाविकास आघाडीचे माढा लोकसभा मतदारसंघासाठी अधिकृत उमेदवारी दिली जाणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजप खासदार विरुद्ध पूर्वाश्रमीचे भाजपचे दिग्गज नेते अशी थेट लढत होण्याचे संकेत मिळत आहेत. भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील असा सामना या निवडणुकीत बघायला मिळण्याची शक्यता आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies