Type Here to Get Search Results !

ठरलं... भाजपचा “या’ बड्या नेत्याची भाजपला सोडचिठ्ठी, सोमवारी 'तुतारी' वाजवणार



माणदेश एक्सप्रेस न्युज : सोलापूर : भाजपचे माळशिरसचे नेते धैर्यशील मोहिते-पाटील  यांनी पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे  आता धैर्यशील मोहिते-पाटील 'तुतारी' हाती घेणार असून, महायुतीच्या अडचणीत वाढ होणार आहे.


भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेल्या मोहिते-पाटील कुटुंबीयांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी माढा लोकसभा निवडणूक लढविण्याचा आग्रह कायम ठेवला होता. भाजपवर दबावतंत्राचा वापर करून उमेदवार बदलण्याची मागणी मोहिते-पाटील आणि रामराजे-नाईक निंबाळकर यांनी केली होती. परंतु भाजपने मात्र मोहिते पाटील व नाईक निंबाळकर यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने, अखेर धैर्यशील मोहिते-पाटील  यांनी पक्षाला राम राम ठोकला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहित मोहिते-पाटलांनी राजीनामा दिला आहे. 


पत्रात काय म्हटलं?

मा.आ.श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, प्रदेश अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र राज्य.

विषय : पद व सदस्यत्वाचा राजीनामा स्वीकारण्याबाबत..

महोदय, 

मी भारतीय जनता पार्टी, सोलापूर जिल्हा, संघटन सरचिटणीसपदाची जबाबदारी सांभाळली आहे. तसेच, माळशिरस विधानसभा निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी माझ्याकडे आहे. या कार्यकाळात जिल्हा, मंडल कार्यकारिणी, मोर्चा, प्रकोष्ठ इत्यादी संघटनात्मक रचना गठीत करून कार्यान्वित करण्याचे कार्य केले. तसेच शक्तिकेंद्र, सुपर वॉरियर, बूथ रचनाही पूर्ण करून सक्रिय केल्या. वेळोवेळी पक्षाचे विविध कार्यक्रम आयोजित करून संघटना व बूथच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले आहे.

आपण माझ्यावर दाखविलेला विश्वास व दिलेल्या संधीबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करतो व आपणास कळवू इच्छितो की, मी माझ्या वैयक्तिक कारणास्तव, भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदांचा, तसेच भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा देत आहे, त्याचा स्वीकार व्हावा ही विनंती.


गुरुवारी (11 एप्रिल) रोजी धैर्यशील मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यातील घरी भेट घेतली होती. अकलूज येथील विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुलात 14 एप्रिल रोजी होणाऱ्या कार्यक्रमात धैर्यशील मोहिते-पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करतील. त्यांच्या पक्षप्रवेशाला माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे, तर 16 एप्रिलला धैर्यशील मोहिते-पाटील शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत माढ्यातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies