म्हसवडच्या श्री सिद्धनाथांचा हळदी समारंभ मोजक्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न

म्हसवडच्या श्री सिद्धनाथांचा हळदी समारंभ मोजक्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्नम्हसवडच्या श्री सिद्धनाथांचा हळदी समारंभ मोजक्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न 

माणदेश एक्सप्रेस न्युज


म्हसवड : राज्यातील अनेक भाविकांचे कुलदैवत व श्रध्दास्थान असलेले येथील श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी देवस्थानचा पारंपरिक शाही विवाह सोहळ्याचा शुभारंभ मोजक्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर मंदीरात श्री ची घटस्थापना करुन हळदी समारंभ संपन्न करण्यात आला.
कार्तिक प्रतिपदा ते मार्गशिर्ष  प्रतिपदा दरम्यानच्या एक महिन्याच्या कालावधीचा हा मंगलमय शाही विवाह सोहळा विविध धार्मिक उपक्रमांनी संपन्न होत असतो.


दिपावली पाडव्यास घटस्थापना व हळदीचा कार्यक्रम व भाऊबीजेच्या सायंकाळी दिवाळी मैदान, तुलसी विवाह दिवशी रात्री 12 वाजता श्री चा विवाह सोहळा व विवाह सोहळ्यानंतर देवदिवाळीस (ता.१५ डिसेंबर) वधू वराची वरात रथातून काढून या शाही विवाह सोहळ्याची सांगता केली जाणार आहे.
दिपावली पाडव्यास सोमवारी (ता.१६) प्रातकाळी मंदीरामधील मुख्य गाभाऱ्याबाहेरील मंडपातील श्री म्हातारदेव मुर्तीच्या समोर मंदीराचे सालकरी अविनाश गुरव  यांचे हस्ते व मंदीराचे मोजकेच पुजारी, मानकरी, सेवेकरी यांचे उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली व  परंपरागत प्रथेनुसार श्रीच्या मुर्तीस हळदी लावण्याचा कार्यक्रम सकाळी साडे अकरा वाजता सुरु झाला. यावेळी मंदीरातील पादुका मंडपात सालकरी अविनाश गुरव त्यांची पत्नी सौ. पायल, परटीण, कुरवली समवेत पाच सुहासिनी महिला, श्रीचे पाळेकरी पुजारी  चंद्रकांत गुरव,शहाजी गुरव, किरण गुरव, अमोल गुरव, कृष्णा गुरव, घडशी व डवरी इत्यादी समवेत साध्या पध्दतीने संपन्न होताच श्रीच्या वर व वधू उत्सव मुर्तींना स्नान घालून त्या पुर्ववत मुख्य गाभाऱ्यातील श्रीच्या मुख्य मुर्तीनजिक स्थानापन्न करण्यात आल्या.
कोरोना साथीमुळे सध्या लॉकडाऊन हा विवाह सोहळा साध्या पध्दतीनेच पार पाडावा लागणार आहे. या विवाह सोहळ्याची सांगता  मंगळवारी ता. १५ डिसेंबरला श्रीच्या मुर्तींची रथातून मिरवणूकीने केली जाणार आहे. पारंपारिक रथ मिरवणूक यात्रेच्या कार्यक्रमास प्रत्येक वर्षी राज्यासह परराज्यातील सुमारे पाच ते सहा लाख भाविकांची उपस्थिती असते. परंतु कोरोनाच्या साथीमुळे यात्रा भरण्यास सरकारने जर परवानगी दिली तरच यात्रा भरु शकेल अन्यथा रद्द केली जाण्याची शक्यता आहे.


कोरोनाच्या साथीच्या संकटामुळे लॉकडाऊन कालावधीत गेली आठ महिने सरकारने कुलुप बंद ठेवलेली राज्यातील सर्व धार्मिक स्थळे काही अटी व शर्तीवर दिवाळी पाडव्यास उघडण्यास परवानगी दिल्यामुळे येथील श्री सिध्दनाथ देवी जोगेश्वरी देवस्थान मंदीराच्या भाविकांत आनंदमय वातावरण होते. दिपावली पाडव्यापासुनच या देवस्थानचा शाही विवाह सोहळा उत्सव सुरु होणार असल्यामुळे भाविकांना श्रीच्या दर्शनाची संधी मिळू शकली. पहाटे पासुनच मंदीरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a comment

0 Comments