![]() |
खरसुंडी : येथे सभामंडपाच्या लोकार्पणप्रसंगी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर व उपस्थित मान्यवर. |
मनोज कांबळे / खरसुंडी : आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील सिद्धनाथ मंदिराचा काही लोक गैरवापर करून भ्रष्टाचार करतात. परंतु आपण सिद्धनाथ देवस्थान बाबत सर्वसमावेशक निर्णय घेऊ असे आश्वासन आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिले. ते खरसुंडी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून बौद्ध समाजातील सभामंडपाच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्या सारिका भिसे, विकास सोसायटीचे चेअरमन धोंडीराम इंगवले, माजी उपसरपंच दिलीप सवने, ग्रा.पं.सदस्य सुभाष केंगार, युवा नेते राहुल गुरव प्रमुख उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, खरसुंडी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मूलभूत सुविधा नाहीत, महिलांकरिता स्वच्छतागृह नाहीत, गावामध्ये भाविकांची गर्दी असते पुढील काळात आपण येथील तीर्थक्षेत्राच्या सोयी-सुविधांसाठी प्रयत्न करू. खरसुंडीच्या सिद्धनाथांवर असंख्य भाविकांची श्रद्धा आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक नाथनगरीत येतात मात्र या मंदिराचा काही लोक गैरवापर करताहेत. यामध्ये मोठा भ्रष्टाचार चालू आहे. देवस्थानच्या कारभाराबाबत लोकांच्या मनामध्ये खदखद आहे, राज्यामध्ये आपले सरकार आहे त्यामुळे याबाबतीत सर्वसमावेशक निर्णय घेण्यासाठी पूर्णपणे ताकद लावू असे पडळकर म्हणाले.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे मी आमदार आहे, पूर्वी काही ठराविक लोकांना मताचा अधिकार होता ही संकल्पना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मोडीत काढली आणि संविधानातून गावगाड्यातील सर्वसामान्य लोकांना मताचा अधिकार आणि आमदार-खासदार होण्याची संधी मिळवून मिळाली. तालुक्यातील खरसुंडी, दिघंची, करगणी, आटपाडी आणि खानापूर तालुक्यातील विटा येथे गतवर्षी आमदार फंडातून रुग्णवाहिका दिल्या. यावर्षी जिल्हा परिषद शाळांच्या मॉडेल स्कूल उपक्रमासाठी आमदार फंडातून निधी दिला आहे. खरसुंडी येथे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पाठपुरावा करू, निधी वाटपात पक्ष पार्टी न पाहता विकासासाठी काम करूया असेही आ.पडळकर म्हणाले.
कार्यक्रमाप्रसंगी विकास सोसायटीचे संचालक शंकर भिसे, नवनाथ कटरे, माजी चेअरमन भगवान भिसे, माजी उपसरपंच नंदकुमार माने, तानाजी क्षीरसागर, शफिक तांबोळी, निलेश वाघमारे सुभाष चोपडे, हिम्मत भिसे, दीपक जाधव, अर्जुन भिसे, नितीन भोरे, छगन साळुंखे, राजू भिसे, प्रमोद सैंब यांच्यासह बौद्ध समाजबांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
हे ही वाचा
राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातीचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
शिंदे समर्थक आमदाराचं उद्धव ठाकरेंसंदर्भातील ते ट्विट व्हायरल I स्पष्टीकरण देताना म्हणाले....
🪀 WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन 'माणदेश एक्सप्रेस' Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा