Type Here to Get Search Results !

काँग्रेसला धक्का ! रामटेकच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने आता नवीन चेहरा मैदानात



माणदेश एक्सप्रेस न्युज : रामटेक : महाविकास आघाडीच्या जागावाटपात रामटेकच्या जागेवर काँग्रेसने आपला उमेदवार घोषित केला. विशेष म्हणजे शिवसेनेची जागा असलेल्या रामटेक मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. 


मात्र, रश्मी बर्वे यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र, जात पडताळणी समितीने रद्द ठरविले. सकाळी समितीने जात प्रमाणपत्र रद्द ठरवल्यानंतर, संध्याकाळी त्यांचा उमेदवारी अर्जही बाद करण्यात आला आहे. त्यामुळे, काँग्रेसला निवडणूकपूर्व मोठा धक्का बसला आहे. 


जात प्रमाणपत्र रद्द ठरवल्यानंतर रश्मी बर्वे यांनी हायकोर्टात धाव घेतली असून यावर तातडीने सुनावणी घ्यावी अशी मागणी केली आहे. मात्र, आता अर्ज छाननीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा उमेदवारी अर्जच बाद ठरवला आहे. त्यामुळे, रश्मी बर्वे यांची उमेदवारी निवडणुकांच्या स्पर्धेतून बाहेर पडली आहे. काँग्रेसने येथील मतदारसंघात प्लॅन बी म्हणून रश्मी यांचे पती शामकुमार यांचा अर्ज दाखल केला होता. त्यामुळे, रामटेकच्या या जागेवर आता श्यामकुमार बर्वे निवडणूक लढवणार आहेत.


रश्मी बर्वे यांनी खोट्या व अवैध कागदपत्रांचा वापर करुन जात प्रमाणपत्र मिळवल्याची तक्रार करत त्यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला होता. याप्रकरणी राज्य सरकारकडेही तक्रार करीत चौकशीची मागणी करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत राज्य सरकारने जिल्हा जात पडताळणी समितीला या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जात पडताळणी समितीने बर्वे यांना नोटीस बजावत कागदपत्र सादर करण्याची सूचना दिली होती. 


मात्र, बर्वे यांनी कागदपत्र सादर न करता हा आपल्या विरोधात राजकीय डाव असल्याचे कारण देत मुदत वाढून मागितली होती. गुरुवारी सकाळी जिल्हा जात पडताळणी समितीने बर्वे यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द ठरविले. या निर्णयाविरोधात बर्वे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. परंतु, निवडणूक आयोगाने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवला आहे. 


रश्मी बर्वेंच्या उमेदवारीत जात पडताळणी प्रमाणपत्रावरून आपल्या अडचणी वाढू शकतात असे लक्षात येताच काँग्रेसने आपली रणनिती बदलली होती. रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांना देण्यात आलेल्या एबी फॉर्मवर दुसऱ्या क्रमांकावर त्यांचे पती श्याम कुमार बर्वे यांचे नाव टाकण्यात आले आहे. 


श्यामकुमार यांनी काँग्रेसकडून स्वतंत्र अर्जही भरला आहे. त्यामुळे, रश्मी यांचा अर्ज बाद झाल्यानंतर आता श्याम कुमार हे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार बनले आहेत.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies